औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून विभक्त झालेल्या ११ पती-पत्नींचे (जोडप्यांचा) वाद शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मिटविण्यात आले असून, आता त्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. महालोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवलेल्या २८ प्रकरणांतील १४ जोडपी हजर झाली होती.
कौटुंबिक न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी २८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १४ जोडपी हजर होती. या जोडप्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यांची मने वळविण्यात यश आल्यामुळे ११ जोडप्यांचा दुभंगलेला संसार पुन्हा जुळला. दोन प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहेत, तर १४ प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर राहिले.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्या. आशिष अयाचित, न्या. व्ही. आर. जगदाळे यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम पाहिले, तर विधिज्ञ ॲड. पौर्णिमा साखरे, ॲड. महेंद्र कोचर, समुपदेशक भरत काळे, ज्योती सपकाळे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.
ही राष्ट्रीय लोकअदालत कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश आय. जे. नंदा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. न्यायालयीन व्यवस्थापिका वंदना कोचर, प्रभारी प्रबंधक एस. आर. दाणी आणि कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.