या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर सोनवणे यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत सर्व शिक्षण व प्रात्यक्षिक शुल्क सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये, शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्क निश्चितीची पुन्हा प्रक्रिया सुरू करावी, तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थांना शुल्क आकारण्याचा हक्क नाही, असा आदेश काढावा, अशी मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत, नर्सरी ते दहावीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करू नये. तसेच बोर्डाने जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत, दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मयूर सोनवणे व अमोल दांडगे यांनी दिला आहे.