छत्रपती संभाजीनगर : वन विभागाच्या नवीन इमारत बांधकामासाठी खोदलेल्या परसभर खड्ड्याला पाण्याचा पाझर लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या भागत पाणीपातळी वाढल्याची चर्चा रेंज कार्यालयात तसेच नागरिकांत आहे. शहरात पाण्याचे टँकर आणल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तर दुसरीकडे वन विभागात झाडांची संख्या जास्त असल्याने अवघ्या सात फुटांवर पाणी लागले आहे.
मोटार लावून त्याचा उपसा केला तरीही पाणी पुन्हा जमा होत आहे. वन विभागाच्या रेंज कार्यालयाची इमारत १९५२ ला बनविण्यात आलेली आहे. तिच्या भिंती जीर्ण झालेल्या असून, पावसाळ्यात पाण्याचे पाझर लागतात. त्यामुळे अनेकदा महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान होण्याची भीती होती. परंतु वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले अन् कॉलम व फुटिंगसाठी खोदलेल्या खड्ड्यातच पाणी लागले. एकूण खड्डे १७ असून, त्या सर्वच खड्ड्यांची खोली ही सात फूट (एक परस)आहे. त्यात तीन फूट नितळ पाणीसाठा आहे.
उपसा करूनही पाण्याचे पाझर..
अवकाळी पावसाचे हे पाणी खड्ड्यात तुंबले असावे म्हणून येथील ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी पाणी पंप लावून उपसले. परंतु परत ते खड्डे पाण्याने भरले. याचा अर्थ असा की, वन विभागात झाड-झुडुपांची संख्या अधिक असल्याने पाणीपातळी वर आली आहे, असे वन परिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.