औरंगाबाद : राज्य महिला आयोगासमोर पत्नीला सुखाने नांदविण्याची हमी देणाऱ्या नवरोबाने पंधरा दिवसांतच माघार घेतली. मागील वेळी माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती. त्यामुळे मी हमी दिली. मी तिला नांदवू शकत नाही, असे या व्यक्तीने आजच्या सुनावणीदरम्यान आयोगाच्या सदस्यांना सांगितले. राज्य महिला आयोगाच्या वतीने मागील काही दिवसांपासून राज्यभर ठिकठिकाणी सुनावण्या घेण्यात येत आहेत. १ जुलै रोजी औरंगाबादेत विभागीय सुनावणी घेण्यात आली. तेव्हा ६५ पेक्षा जास्त प्रकरणांत सुनावणी झाली. त्यात घरगुती छळाच्या तसेच नांदवत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी होत्या. सुनावणीदरम्यान त्यातील काहींनी कारवाईच्या भीतीने तर काहींनी समुपदेशानामुळे महिलेला नांदविण्याची हमी दिली, तर समेट न झालेल्या काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आयोगातर्फे आज पुन्हा विभागीय स्तरावरील सुनावणी आयोजित करण्यात आली होती. त्यात मागील वेळी समेट घडलेल्या एका प्रकरणातील व्यक्तीने येऊन पत्नीला नांदवायला स्पष्ट शब्दांत नकार दिला. मी मागील वेळी पत्नीला नांदवायची हमी दिली होती. मात्र, तेव्हा माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती. आज मी शुद्धीवर आहे, मी तिला नांदवू शकत नाही, असा खुलासा त्याने आयोगाच्या सदस्यांसमोर केला. त्यामुळे हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. ४० प्रकरणांवर सुनावणीमहिला आयोगाने आज दिवसभरात ४० तक्रारींवर सुनावणी घेतली. यामध्ये बहुतांश तक्रारी कौटुंबिक छळाच्या होत्या. त्याशिवाय २ तक्रारी कार्यालयातील सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाच्या आणि ५ तक्रारी फसवणुकीच्या होत्या. कौटुंबिक छळाच्या ८ प्रकरणांमध्ये समुपदेशानाद्वारे समेट घडवून आणल्याचे महिला आयोगाच्या सदस्य आशा भिसे यांनी सांगितले.
बायकोला नांदविण्यास नवरोबाचा नकार
By admin | Published: July 16, 2014 1:10 AM