औरंगाबाद : देव-देवतांचा जयघोष करीत पहाटे ६ वाजता भाविकांसाठी सर्व मंदिरांचे दरवाजे उघडले. तब्बल १९ महिन्यांनंतर मंदिरात भगवंतांचे दर्शन घडल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यात आज देवींच्या मंदिरात महापूजा, घटस्थापना, आरती करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
घटस्थापनेच्या दिवशी मंदिर उघडण्यात आले हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया काही भाविकांनी व्यक्त केल्या.भाविकांमध्ये एवढा उत्साह संचारला होता की, पहाटे ४ वाजेपासूनच कर्णपुरा देवी, सिडको एन ९ येथील रेणुकामाता मंदिराबाहेर भाविक रांगेत उभे होते.
कर्णपुरा देवीच्या मंदिरात पहाटे ५ वाजेपासून महापूजेला सुरुवात झाली होती. सकाळी ७.३० वाजता घटस्थापना करण्यात आली व ८ वाजता आ. अंबादास दानवे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. या वेळी भाविकांनी मंदिर भरून गेले होते.