औरंगाबाद : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी पूर्ण सरकार मंगळवारी दिवसभर औरंगाबादेत होते. बैठकीसाठी मंत्री येणार असल्यामुळे त्यांच्या सरबतीसाठी भाजपतील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु यामध्ये भाजपतील एकही जुना पदाधिकारी अथवा नेता नव्हता. पक्षात अलीकडे झालेल्या नवभरतीमुळे जुन्यांना दारात उभे राहावे लागले. तर नवखे मंत्र्यांच्या ताफ्यात फिरत होते. भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून नवा-जुना असा वाद सुरू आहे. त्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ आॅगस्ट रोजी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. मुख्यमंत्र्यांनी संजय केणेकर, एकनाथ जाधव, डॉ.भागवत कराड यांच्या निवासस्थानी चहापान केले. मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त मुख्यमंत्री शहरात आले असता त्यांनी शिरीष बोराळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. आ. अतुल सावे यांच्याकडे मुख्यमंत्री स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. मंत्र्यांच्या वाहनात बसण्यावरून विमानतळापासून धुसफूस सुरू झाली. विमानतळात प्रवेशासाठी काही पदाधिकाऱ्यांना पासेस देण्यात आल्या होत्या. ते पदाधिकारी मंत्र्यांच्या ताफ्यात बसले; परंतु मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे आगमन होताच अनेकांची ताफ्यातील वाहनांत बसण्यासाठी झुंबड पडली. पासेस नवख्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आपल्याला मिळाल्या नाहीत. हे लक्षात येताच अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला.
नवखे आत; जुने दारात
By admin | Published: October 05, 2016 1:06 AM