औरंगाबाद : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्यात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोपाचे प्रकरण आता औरंगाबादेत येऊन पोहोचले आहे. समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जातीवर टिपणी केल्याने आमची समाजात, नातेवाईकांमध्ये बदनामी होत असून प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल करून केली.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिक हे सातत्याने आरोप करत आहेत. समीर यांचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्यांनी एका मागासवर्गीयाचा हक्क हिसकावला असल्याचा आरोप मलिक यांनी केला. या आरोपामुळे वानखेडे यांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार औरंगाबाद येथील समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी केली आहे. त्यांनी आज मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जातील तक्रारीनुसार, मंत्री मलिक यांनी समीर वानखेडे यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप केल्याने आमची समाजात बदनामी होत आहे. नातेवाईक विचारत आहेत की, तुम्ही मुस्लीम आहात काय ? मुलीमुलांच्या विवाहाचे प्रश्न आहेत. समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच मंत्री मलिक सातत्याने खोटी माहिती जाणीवपूर्वक प्रसारित करत आहेत. या प्रकारामुळे माझ्यासह कुटुंबातील सर्व मानसिक तणावात आहेत. जातीवादी वक्तव्य केल्यामुळे मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, असे म्हटले आहे.
यावेळी त्यांनी मुकुंदवाडी येथे एका कार्यक्रमात गुंफाबाई, तसेच प्रमोद भालेराव, सोबत समीर वानखेडे तसेच ज्ञानदेव वानखेडे यांच्यासह कुटुंबात एकत्र बसलेला फोटो दाखवून नातेवाईक असल्याचे स्पष्ट केले. वानखेडे परिवार (महार) नवबौद्ध असल्याचेही त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. मुकुंदवाडी परिसरात रेल्वेपटरी पलिकडे झोपडपट्टीत राहणाऱ्या गुंफाबाई व त्यांचा मुलगा प्रमोद भालेराव यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. चौकशी करून त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तक्रार अर्ज दिला आहे...समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन चौकशी करून ऑट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे. परंतु येथे चौकशी करण्यासारखे काय आहे. ही बाब वरिष्ठाकडे येते. असे पोलीस निरीक्षक मनोज पगारे म्हणाले.