- राम शिनगारे/ सुमेध उघडे ।औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात उभारलेल्या वसतिगृहांची दुरुस्ती होणार आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांच्या आदेशाने आमदार सतीश चव्हाण यांनी अजिंठा वसतिगृहाची बुधवारी पाहणी केली. या वसतिगृहांच्या अवस्थेवर महापरिनिर्वाणदिनी ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील गोरगरीब, मागास विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे यासाठी नागसेनवनात विद्यापीठाच्या स्थापने अगोदर मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन वसतिगृहांची उभारणी केली होती. या वसतिगृहांचे बांधकाम स्वत: बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार आणि त्यांच्या देखरेखीखाली झालेले आहे. महामानवाने उभारलेल्या वसतिगृहांशी आंबेडकरी चळवळीच्या भावना जुळलेल्या आहेत; मात्र सध्या नागसेनवनातील अजिंठा, सुमेध वसतिगृहांची अवस्था विदारक आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. खोल्यांवरील कौलारू, खिडक्या, दरवाजे, स्वच्छतागृह नादुरुस्त आहेत. महाविद्यालयांकडे निधीची कमतरता असल्यामुळे वसतिगृहांची दुरुस्ती रखडली आहे. यातच परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
या वसतिगृहांच्या परिस्थितीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. याविषयीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मेलद्वारे कळविण्यात आली, तेव्हा शरद पवार यांनी नागसेनवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या वसतिगृहांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. वसतिगृहांच्या कोणत्या गोष्टींची दुरुस्ती करावी लागेल, याची पाहणी करण्यासाठी आ. चव्हाण यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी अजिंठा वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या खोल्या, स्वच्छतागृहे आदींची पाहणी करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान, मिलिंद विज्ञानचे डॉ. मोहम्मद शफी, विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य प्रा. सुनील मगरे, डॉ. राजेश करपे आदींची उपस्थिती होती. याविषयी आ. चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी अधिक बोलणे टाळले.
अजिंठा वसतिगृहापासून सुरुवात
अजिंठा वसतिगृहाची सर्वात अगोदर दुरुस्ती केली जाणार आहे. या वसतिगृहातील नादुरुस्त खोल्यांचे कौलारू, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लाईट फिटिंग, स्वच्छता, फरशा, खिडक्या, दरवाजे आदींची दुरुस्ती केली जाईल. ज्याठिकाणी आवश्यकता असेल, त्याठिकाणी नवीन साहित्य बसविण्यात येईल, असेही समजते.
शरद पवार देणार निधीनागसेनवनातील वसतिगृहांची दुरुस्ती करण्यासाठी शरद पवार आपल्या खासदार फंडातील निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी सविस्तर प्रस्ताव देण्याच्या सूचनाही आ. चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. यानुसार वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी लागणा-या निधीचा प्रस्ताव स्थापत्य विशारद यांच्याकडून तयार करून घेतला जाणार आहे.
संस्थेचा विकास झाला पाहिजेसमाजातील लोकांना याठिकाणी दुरुस्ती करावी वाटत आहे, ही आनंदाची बाब आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी बुधवारी पाहणी केली. यामुळे दुरुस्तीसाठी निधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. पीईएस संस्था ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करते. यामुळे समाजातील प्रत्येकानेच संस्थेच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे.- डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्या, मिलिंद कला महाविद्याल