छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर
By राम शिनगारे | Published: October 21, 2024 07:17 PM2024-10-21T19:17:31+5:302024-10-21T19:18:50+5:30
महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही.
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्वच पणाला लागले आहे. महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही. त्यातच विधान परिषदेचे आ. सतीश चव्हाण यांचे पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबन झाले. शिक्षक आ. विक्रम काळे धाराशिव जिल्ह्यातील कळंब विधानसभेची तयारी करीत आहेत. त्यामुळे पक्षाला जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी उरला नसल्याने अस्तित्वच धोक्यात आले आहे.
भाजपने पहिल्या यादीत जिल्ह्यातील तीन विद्यमान जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन आणि सहा विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहा आणि भाजपचे तीन उमेदवार विजय झाले होते. शिवसेनेनेत फूट पडल्यानंतर पाच आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंना साथ दिली, तर एक आमदार ठाकरेंसोबत राहिला. महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा समावेश आहे. त्यांच्या पक्षाचे मराठवाडा पदवीधरचे आ. सतीश चव्हाण गंगापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. हा मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटल्यामुळे आ. चव्हाण ‘तुतारी’ हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात प्रसिद्धपत्रक काढले. त्यानंतर पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. आता आ. चव्हाणांचे समर्थक पदाधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समर्थक पदाधिकारी पक्षातच राहणार
आ. चव्हाण यांचे पक्षातील समर्थक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, युवक काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. दत्ता भांगे यांची नावे आघाडीवर होती. विद्यापीठाच्या राजकारणात आ. चव्हाण यांनी प्रा. मगरे, ॲड. भांगे यांना पदवीधर गटातून अधिसभेवर निवडून आणले. त्यात दोघांनाही व्यवस्थापन परिषदेची संधी दिली होती. मात्र, समर्थक पदाधिकारी आ. चव्हाण यांच्यासोबत जाणार नसून, उपमुख्यमंत्री पवारांच्याच पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.