पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 07:37 AM2019-08-08T07:37:18+5:302019-08-08T07:38:53+5:30

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे.

NCP MP Dr. Amol Kolhe criticizes those who leave the party | पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

पानगळ गळली आता नवी पालवी फुटत आहे; डॉ. अमोल कोल्हे यांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

googlenewsNext

औरंगाबाद - इतिहासाची पुनरावृत्ती होतात असे म्हणतात. ८४ साली शरद पवारांना आजच्या सारखेच लोक सोडून जात होते मात्र गेले त्यापेक्षा दुप्पट आमदार पवारसाहेबांनी निवडून आणले. पानगळ गळली की नव्याने पालवी फुटते तशीच पानगळ जावून नवी पालवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून फुटली आहे असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत मांडले. 

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला. आपली यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा संपुष्टात आणली. गंगापूरचे स्थानिक आमदारांनी असे भाष्य केले की आश्वासन फक्त द्यायचे असते पूर्ण करायचे नसते. या वाक्याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत करा. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा येत्या काळात बदल घडवून शिवस्वराज्य स्थापन करण्यास सिंहाचा वाटा द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

तसेच शिवस्वराज्य यात्रेला सुरुवातीला ट्रोल करण्यात आले. राष्ट्रवादीचे इतर नेते कुठे आहेत अशी विचारणा केली गेली. जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड पुरपरिस्थिती असल्याने जनतेची मदत करत आहेत. धनंजय मुंडे परळीतील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर भांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेतृत्व जनतेसाठी काम करत आहेत असेही अमोल कोल्हे म्हणाले. 

दरम्यान सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत आहे. सरकारमार्फत दोन समाजात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. भांडणं लावून राजकारण करायचे हेच तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी करत येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचा मुख्यमंत्री असला पाहिजे असं आवाहन जनतेला केले.

शेतकर्‍यांची जाणीव नसलेले सरकार - अजित पवार
शेतकऱ्यांची जाणीव नसलेले सरकार आल्यावर काय घडतं हे गेले पाच वर्ष राज्यातील जनता अनुभवत आहे सरकार जनतेकडे लक्ष न दिल्यामुळेच राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली. तरुणांच्या हाताला काम नाही. बेकारीशी झुंज देत आहेत. मेगाभरतीबाबत काय झाले याचा जबाब सरकारने द्यायला हवा. द्यायचे नाही तर लोकांची दिशाभूल का करता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला. तसेच आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय घटनेने आपल्याला दिला आहे परंतु सध्याचे सरकार दडपशाही करुन आंदोलन करणार्‍याला अटक करून तुरुंगात टाकत आहे. हे काय सुरु आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
 

Web Title: NCP MP Dr. Amol Kolhe criticizes those who leave the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.