औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी भवनमध्ये संवाद साधत असतानाच त्यांना भेटण्यासाठी आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अॅड. तुषार पाटील शेजवळ यांनी विद्यमान शहराध्यक्ष विजयराव साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणारे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी भवनमध्ये महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. त्याचवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभागीय निरीक्षक अॅड. तुषार शेजवळ पाटील यांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार रात्री अकरा वाजता घडला आहे. याविषयी अॅड. शेजवळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले की, खा. सुळे या महापालिका निवडणुकीची आढावा बैठक घेत होत्या. त्या बैठकीत नगरसेवकपदाची उमेदवारी मिळावी, याविषयी मत मांडले. बैठकीनंतर शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी माझा हात पकडून जोरात धक्का मारून ‘तू खूप माजला का?’ असा सवाल केला. तेव्हा शहराध्यक्ष विजयराव साळवे हे आले. त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कार्यकर्त्यांना मारण्यास सांगितले. साळवेंपासून जिवाला धोका असून, यातत पक्षाने लक्ष घालावे, अशाी मागणी केली.
काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. तेव्हा बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेऊन शहराध्यक्ष निवडताना संधी देण्याची मागणी केली होती. औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले होते. त्यामुळेच मला मारहाण करण्यात आली आहे. पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून पोलिसात तक्रार दिली नाही.-अॅड. तुषार पाटील शेजवळ, माजी शहराध्यक्ष
मारहाणीचा प्रकार घडलाच नाहीराष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी सायंकाळी खा. सुप्रिया सुळे आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला. बैठक अतिशय चांगली झाली. मात्र अॅड. तुषार पाटील यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला नाही. त्यांनी कशामुळे उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, याची शहानिशा करावी लागेल. त्याविषयी अधिक माहिती नाही.-अभिषेक देशमुख, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस