औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १६ मे रोजी औरंगाबादमध्ये पक्षाचे नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या परिषदेतच जिल्ह्यातील १४१ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. जून महिन्यातील पेरणीपूर्व कामासाठी ही मदत राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून दिली जाणार आहे. अशा दुष्काळी परिषदा आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचे कार्यक्रम सर्व जिल्ह्यांत घेतले जाणार आहेत. या परिषदेसाठी पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनाही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरघोस मदत करीत असल्याच्या विषयावर बोलताना मुंडे म्हणाले की, शिवसेना सत्तेत आहे. त्यांनी आर्थिक मदतीपेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी आणि ती देता येत नसेल, तर सत्तेत राहू नये. सरकारने येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत आणि त्याची आतापासूनच तयारी करावी, अशी आमची मागणी आहे.
राष्ट्रवादीची १६ मे रोजी दुष्काळी परिषद
By admin | Published: May 10, 2016 12:35 AM