लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर महानगरपालिकेने केलेल्या घरपट्टी वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी काढण्यात येणारा मोर्चा बारगळला़ काही कारणास्तव हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद गौस झेन यांनी सांगितले़परभणी महानगरपालिकेने केलेल्या घरपट्टी वाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीही निवेदन दिले; परंतु, मनपात विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी या संदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही़ या पार्श्वभूमीवर घरपट्टी वाढीला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी मनपावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते़ त्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी शहरात पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीला १८ पैकी फक्त चारच नगरसेवक उपस्थित होते़ त्यामुळे बैठकीचा हेतु सफल झाला नाही़ पक्षाचेच नगरसेवक मोर्चा काढण्यासाठी उत्सुक नसल्याची चर्चा आहे़ कारण गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीचीच मनपात सत्ता होती़ २०१२-१३ या वर्षात राष्ट्रवादीच्या कार्यकाळातच घरपट्टी वाढीचा ठराव घेतल्याचीही चर्चा आहे़ त्यामुळेच अनेक नगरसेवक बैठकीला आले नसल्याचे समजते़ या संदर्भात माहिती देताना पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद गौस झेन म्हणाले की, ७ सप्टेेंबर रोजी मनपावर पक्षाकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता़ परंतु, काही कारणास्तव तो स्थगित करण्यात आला आहे. मोर्चाची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे़
राष्ट्रवादीचा मोर्चा बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:06 AM