लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रवादीची नाळ शेतक-यांशी जोडलेली आहे. त्यांच्या प्रश्नावर लढलो, लढत आहोत आणि लढत राहूत. हा मोर्चा नसून एक इशारा समजा. आता शेतक-यांचा संयम सुटला असून, महिन्याची मुदत देत आहोत. या कालावधीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकरी हातात रुमणे घेतील, असा इशारा भाजप सरकारला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.सरसकट कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व धनंजय मुंडे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाºयांसह कार्यकर्ते, शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.पुढे धनंजय मुंडे म्हणाले, मागील २२ वर्षांत जिल्ह्यात असा मोर्चा झाला नाही. या मोर्चाने इतिहास घडविला. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सर्वसामान्यांची दिशाभूल केली. अच्छे दिन केवळ जय शाह व भाजप नेत्यांनाच आले आहेत. सर्वसामान्यांचे तर अच्छे होते, तेही बुरे दिन झाले आहेत. महागाई वाढणार नाही, असे सरकारने सांगितले; परंतु पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. ‘भाईयों और बहनों’ म्हणून ४०० रुपयांचे सिलेंडर ८०० वर नेले अन् ‘अबकी बार मोदी सरकार’ घ्या गोंदवून, असे म्हणून मुंडेंनी मोदी सरकारची खिल्ली उडविली.दिवाळीच्या तोंडावर जनसामान्यांच्या तोंडची साखर पळविली. दिवाळीही कडू झाली. ‘अरे खायेगा इंडिया, तो जागेगा इंडिया’ असे म्हणूनही मुंडेंनी सरकारवर घणाघाती आरोप केले. कर्जमाफीबद्दल ते म्हणाले, या सरकारला कर्जमाफी म्हणजे काय, हेच माहीत नाही. त्यांनी अभ्यास करावा. ही कर्जमाफी फसवी आहे. शेतक-यांची फसवणूक या सरकारने केली आहे. महापुरुषांचे नाव देऊन त्यांचा अपमान केल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.दरम्यान, नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उपस्थित इतर मान्यवरांनीही मोर्चाला संबोधित केले. सरकारवर सर्वांनीच कडाडून टीका केली.
...तर शेतकरी हातात रुमणे घेतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:39 PM