- न्या. नरेंद्र चपळगावकर, अ.भा. मराठीसाहित्य संमेलनाध्यक्ष
बी. रघुनाथ यांच्यानंतर ज्याला ग्रामीण जीवनाची आणि त्यातही मराठवाड्याच्या आणि आसपासच्या भागाची नाडी लक्षात आली आणि जी ज्याच्या जीवनाचा भाग बनली असे कवी म्हणजे ना.धों. महानोर. ग्रामीण भागातला कवी, मराठवाड्यातला कवी, अशा वेगवेगळ्या विशेषणाने आपण कवींची ओळख करून देतो, खरं म्हणजे माणसाची अशी ओळख फार मर्यादितरित्या उपयोगाला पडते. कवी म्हणून त्याचं सामर्थ्य हे अगदीच स्वतंत्र असते. अर्थात त्याच्या लेखनातून त्याला भोवतालचा निसर्ग आणि संस्कृती प्रकट होते.
महानोर केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर ते हा निसर्ग स्वत: जगतात ते स्वत:चे अनुभव जीवन सांगू लागतात. तेव्हा आपोआप त्यांची कविता जन्माला येते. जवळजवळ मागील ६० ते ६५ वर्षांचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. औरंगाबादला आपण यावं, आपल्या कवितेबद्दल येथील मित्रमंडळी काय म्हणतात, हे ऐकावं अशी त्यांची इच्छा असायची. यातूनच प्रा. चंद्रकांत पाटलांची आणि त्यांची मैत्री झाली. दोघांनी एक, दोन प्रातिनिधिक स्वरूपात कवितासंग्रहही काढले. पुढे त्यांच्या रानातल्या कवितेपासून वेगवेगळे कविता संग्रह प्रकाशित झाले. महाराष्ट्रातील शेती, संस्कृतीत ज्यांचे भावजीवन गुंतलेले होतं असा हा कवी, अनेक जाणत्या नेत्यांनाही आपला वाटत होता. मराठवाडा साहित्य परिषद आणि इतर सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा चांगला संबंध होता.
दोन गोष्टींचा लळात्यांना दोन गोष्टींनी लळा लावला होता. एकतर त्यांनीच सांगितल्याप्रमाणे या रानाने त्यांना लळा लावला होता. दुसरा लळा म्हणजे त्यांच्या आयुष्याची साथ थोड्याच दिवसापूर्वी सोडून गेलेल्या सुलोचनाबाईंचा. व्यावहारिक जीवनात अनेक संकटे महानोरांना भोगावी लागली. पण त्यांचं मन रसरशीत ठेवायला त्यांची कविताच उपयोगी पडली. माझ्या या मित्राला माझी मनपूर्वक श्रद्धांजली.
कॉलेज जीवनात घरी भेट झालेली मी आणि माझ्या बहिणी येथे शिक्षण घेत होतो. तेव्हा स.भु. कॉलनीत आम्ही राहत होतो. यावेळी ना.धों. महानोर आम्हाला भेटायला आमच्या घरी आले होते. ख्यातनाम समीक्षक सुधीर रसाळ, साहित्यिक वा.ल. कुलकर्णी यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर त्यांनी आणि विजयाबाई राजाध्यक्ष यांनी महाराष्ट्रभर महानोरांच्या कविता पोहोचविण्यासाठी हातभार लावला.