बीड : धूम्रपान, व्यसन या गोष्टी आरोग्याला घातक आहेत. हे माहीत असतानाही अनेक जण त्यापासून दूर राहत नाहीत. तंबाखूमुक्तीसाठी मनपरिवर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.शहरातील जालना रोडवर जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, डॉ. अशोक उनवणे, डॉ. संजय पाटील, डॉ. सत्येंद्र दबडगावकर यांची उपस्थिती होती. नवल किशोर राम म्हणाले, हुंडा पद्धती समाजातून नाहीशी व्हावी यासाठी कायदा आहे. मात्र, असे असतानाही तो सर्रास दिला आणि घेतला जातो. व्यसनाचेही असेच आहे. समाजाने त्यालाही जीवनाचा अविभाज्य भाग मानले आहे. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या व्यसनाच्या उदात्तीकरणामुळे लोकांवर त्यांचा थेट प्रभाव पडतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.तंबाखूला हद्दपार करण्यासाठी डॉक्टर, आशा, अंगणवाडीसेविका, परिचारिका व समाजातील सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शिक्षकांनी तंबाखूमुक्त शाळेसाठी आग्रही राहावे. अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी असतात. त्यामुळे त्यांच्या वर्तनातही व्यसनाचा प्रभाव नसावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. समाजाने हे आव्हान स्वीकारले तर तंबाखूमुक्ती व्हायला वेळ लागणार नाही, असा दावाही त्यांनी केला. यावेळी डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तंबाखूमुक्तीसाठी मन परिवर्तनाची गरज
By admin | Published: April 01, 2017 12:10 AM