- जयंत कुलकर्णी
औरंगाबाद : भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अभाव आहे. देशात फक्त बंगळुरू येथेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉलचे मैदान आहे. बास्केटबॉलमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी भारतात किमान मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई आदी महानगरांत तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे औरंगाबाद येथे सोमवारपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी विशेष भृगुवंशी हा औरंगाबादेत सोमवारी सकाळी दाखल झाला. यावेळी त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या कामगिरीविषयी छेडले असता विशेष भृगुवंशी म्हणाला, ‘‘सध्या भारतीय संघाचा दर्जा चांगला आहे. आम्ही खेळण्याआधी भारतीय संघ टॉप १२ मध्ये असायचा. आता भारतीय संघ अव्वल आठमध्ये आहे. भारतीय संघ सातत्याने आशियाई स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठत आहे.’’
आॅलिम्पिक दर्जाची मैदान उभारावी
आॅलिम्पिकसाठी भारतीय संघ कधी पात्र ठरेल, असे विचारल्यानंतर तो म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकला पात्र ठरणे ही फार दूरची बाब आहे. भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधांचा अभाव आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांयुक्त बास्केटबॉलचे मैदान फक्त बंगळुरू येथेच आहे. छोटे शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना अद्ययावत सुविधांयुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्या यासाठी सरकारने मुंबई, कोलकाता, चेन्नई आदी महानगरात चार ते पाच आॅलिम्पिक दर्जाच्या मैदान असणाऱ्या केंद्राची उभारणी करायला हवी. त्याचा भविष्यात निश्चितच खेळाडूंना फायदा होईल. बास्केटबॉल हा युरोपमधील खेळ आहे. त्यामुळे परदेशी प्रशिक्षक आणणे आपल्या खेळाडूंचा खेळ उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ’’
सरकार, प्रशिक्षकांनीही अपडेट राहायला हवे
केंद्रीय क्रीडामंत्री म्हणून आॅलिम्पिक पदक विजेता राज्यवर्धनसिंह राठोड असल्याने खेळाडूंना फायदा होत असल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘‘राज्यवर्धनसिंह राठोड हे क्रीडमंत्री असल्यामुळे खेळाडूंना पैसे मिळत आहेत. तसेच आॅलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ‘खेलो इंडिया’सारखा प्रकल्प राबवला जात असून तो खूप प्रशंसनीय आहे. सरकार, प्रशिक्षकांनीही अपडेट राहायला हवे. नवनवीन बाबीसमोर येत आहेत. त्यानुसार खेळाडूंसाठी शिबिराचे आयोजन करायला हवे. त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी स्पोर्टस् सायकॉलॉजीमधील तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीचे महत्त्व समजेल तसेच तात्काळ निर्णयक्षमता वाढेल.’’
आशियाई स्पर्धेत देशाला जिंकून द्यायचे२०१७ मध्ये गुडघ्याला दुखापत झाल्याने आपण खेळू शकलो नाही; परंतु आता पुन्हा पुनरागमन करून भारताला आशियाई स्पर्धेत विजेतेपद पटकावून देण्याचे आपले मुख्य लक्ष्य आहे, असे भारतीय बास्केटबॉल संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या विशेष भृगुवंशी याने सांगितले. बास्केटबॉलसाठी जास्त उंचीच महत्त्वाची असते हे म्हणणे चुकीचे आहे. जास्त उंचीचा फायदा होत असतो; परंतु कमी उंचीचेदेखील एनबीएत अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. भारताने चीनवर दोनदा मिळवलेला विजय हा आपल्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे त्याने सांगितले. फक्त मेहनत व सातत्यावर लक्ष केंद्रित करून शहर व देशाचे नाव उंचवावे, असा सल्लाही त्याने उदयोन्मुख खेळाडूंना दिला. विशेष भृगुवंशी याने २00६ ते २0१७ दरम्यान भारतीय बास्केटबॉल संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचप्रमाण आॅस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील व्यासायिक लीग बास्केटबॉल स्पर्धेत चार वर्षे खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.