बापू सोळुंकेलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नियम तोडून राँग साइडने सुसाट वाहने पळविणाºयांमुळे शहरात रोज लहान-मोठे अपघात घडत असतात. शहरातील विविध रस्त्यांवर राँग साइड वाहने पळविणाºया वाहनचालकांना रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे समोर आले.
वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास त्याला अपघाताला सामोरे जावे लागत नाही. मात्र, रस्त्यावरील सर्वच वाहनचालकांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. नियम मोडून वाहन पळविणारा चालक त्याच्यासह अन्य लोकांचे प्राणही धोक्यात घालत असतो. ही बाब अज्ञान व्यक्तीलाही समजते. मात्र, असे असूनही शहरातील विविध रस्त्यांवर आणि चौकातून जाणाºया रस्त्यावर वाहनचालक राँग साइडने वाहने चालविताना नजरेस पडतात. मुख्य शहरातील व्हीआयपी रोडवरील कार्तिकी हॉटेल वाहतूक सिग्नल ते सिद्धार्थ उद्यान रस्त्यावर राँग साइड वाहनचालक मोठ्या प्रमाणात दिसतात. विशेष म्हणजे ही वाहतूक पोलीस चौकात उभा असेल तरीही त्यांना न जुमानता दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाचालकही या रस्त्यावर राँग साइडने येऊन रस्ता ओलांडताना दिसतात.
याप्रमाणेच क्रांतीचौकाकडून नूतन कॉलनीकडे जाणाºया रस्त्यावर हजारो वाहनचालक राँग साइड वाहने चालविताना नजरेस पडतात. विशेष म्हणजे क्रांतीचौक पोलीस ठाणे या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आहे. अदालत रोडवरही राँग साइड वाहनचालकांनी धुमाकूळ घातला. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुन्नीलाल पेट्रोलपंपाकडे वाहनचालक राँग साइड वाहनचालक वेगात असतात. यासोबतच महावीर चौकाकडून अदालत चौकात येणाºया रस्त्यावर राँग साइडने शेकडो वाहने विरुद्ध दिशेने धावतात. या चौकात वाहतूक पोलीस उभे असतात. शिवाय पोलिसांनी तेथे बॅरिकेड्सही लावले होते. मात्र, त्याचा कोणताही परिणाम वाहनचालकांवर झालेला नाही.
हायकोर्ट वाहतूक सिग्नल ते सिडकोकडे जाणाºया रस्त्यावर अग्रसेन महाराज चौकाकडून हायकोर्टापर्यंत आणि राज पेट्रोलपंपापर्यंत रोज हजारो वाहनचालक जीव धोक्यात घालून राँग साइड वाहने चालविताना दिसतात. अशाच प्रकारे बेदरकार आणि सुसाट वाहनचालक बीड बायपास रोडवर ठीकठिकाणी नजरेस पडतात. बीड बायपास रोडवरील ४१ ठिकाणी अनधिकृतपणे तोडण्यात आलेले दुभाजक गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांच्या सूचनेनुसार बंद केले. महामार्गावर एक किलोमीटर अंतराच्या आत दुभाजक तोडून वळण रस्ता उपलब्ध करता येत नाही.
या नियमानुसार एक किमी. अंतरावरील ४१ लूप बंद केल्यापासून बायपासवरील राँग साइड वाहनचालकांची संख्या झपाट्याने वाढली. देवळाई चौकाकडून झाल्टा फाट्याकडे जाणा-या रस्त्यावर आणि एमआयटी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर नियम तोडून हजारो वाहने धावतात.