लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील छोट्या-मोठ्या तब्बल ४३ यंत्रांनाच उपचाराची गरज आहे. येथील ६४ स्लाइड सिटी स्कॅन यंत्र ८ सप्टेंबरपासून बंद आहे. सीव्हीटीएस विभागातील कॅथलॅब नादुरुस्त झाले. या यंत्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे.घाटी रुग्णालयातील यंत्रांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी वेळीच निधी मिळत नसल्याने अनेक यंत्रसामुग्री धूळखात आहे.घाटी प्रशासनाकडून पाठपुरावा केला जातो. परंतु वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याने गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. आॅक्टोबरच्या प्रारंभी ‘उरोशल्यचिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा’ (सीव्हीटीएस) विभागातील कॅथलॅब नादुरुस्त झाले. त्यामुळे येथील अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी ठप्प झाल्या.दोन महिने उलटूनही ६४ स्लाइड सिटी स्कॅन यंत्राची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी रुग्णांचा भार वाढल्याने ६ स्लाइड सिटी स्कॅन यंत्र वारंवार नादुरुस्त होतआहे.व्हेंटिलेटरसह अनेक छोट्या-मोठ्या ४३ यंत्रांना देखभाल-दुरुस्तीची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी निधीची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.आश्वासनावर निभावली वेळकराराचे पैसे थकल्यामुळे ६४ स्लाइड सिटी स्कॅन यंत्र दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. परंतु आता डिसेंबरमध्ये रक्कम देण्याचे आश्वासन संबंधित कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीने दुरुस्तीची तयारी दर्शविली असून, आवश्यक असलेले या यंत्राचे पार्ट मागविण्यात आले आहेत. आठवडाभरात यंत्र कार्यान्वित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
घाटीतील ४३ यंत्रांनाच उपचाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:58 AM