वाळूज महानगर : भौतिक सुखाच्या मागे न पळता जिवनात सुखशांतीसाठी अध्यात्माकडे वळण्याची गरज असल्याचे प्रबोधन महंत रामगिरी महाराज यांनी येथे केले.
वाळूज येथील झेंडा मैदानात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते समाजप्रबोधन करीत होते. सप्ताहात दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा वाचन, हरिपाठ, हरि किर्तन, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
महंत रामगिरी महाराज म्हणाले की, महाराष्टÑ ही संताची भुमी असून, साधू-संतांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे.आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे पळत सुटल्यामुळे जिवनातील सुखशांती हरवून बसला आहे. त्यामुळे जिवनात सुखशांतीसाठी साधु-संताचे विचार आचरणात आणून अध्यात्माचा मार्ग अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सप्ताह संयोजन समिती व वाळूजच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.