औरंगाबाद, दि. २५ : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीबाहेरील परिसरात वाहणारे नाले भूमिगत करण्याची गरज आहे. यामुळे विमानतळाच्या हद्दीत वावरणारे पक्षी, मोकाट कुत्रे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येतील. यासाठी महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
विमानतळाच्या हद्दीतून तीन नाले वाहत आहेत. जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांतून वाहणारे नाले थेट विमानतळाच्या संरक्षक भिंतीखालून वाहत धावपट्टीखालून जातात. बाराही महिने वाहणा-या या नाल्यांमुळे परिसरात पक्ष्यांचा मुक्त संचार दिसतो. नाल्यातून प्लास्टिकच्या पिशव्या, मेलेली जनावरे असा कचरा संरक्षक भिंतीजवळच जमा होतो. त्यामुळे नाल्यातील कच-यातून मिळणा-या खाद्यपदार्थांमुळे पक्ष्यांबरोबर मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार होत आहे. यातून अनेकदा विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण होण्याच्या घटना होतात.
ही परिस्थिती लक्षात घेऊन विमानतळ प्राधिक रणाने विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करण्यासाठी पुढाकार घेतला. निविदा प्रक्रियेनंतर एप्रिल महिन्यात नाले भूमिगत करण्याचे काम सुरू झाले. पावसामुळे कामात अडचणी येत आहेत; परंतु लवकरच विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत होतील; परंतु केवळ विमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करून हा प्रश्न सुटणार नाही. संरक्षक भिंतीखालून येणाºया नाल्यांमध्ये प्राधिक रणातर्फे लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. या जाळ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. त्यातून पक्षी, मोकाट कुत्र्यांना आयते खाद्यपदार्थ मिळत आहेत, त्यामुळे विमानतळाच्या हद्दीबाहेर वाहणारे नालेही भूमिगत होण्याची गरज आहे, तरच हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. नाल्यांमुळे निर्माण होणा-या अडचणींविषयी विमानतळ प्राधिक रणाने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना माहिती दिली. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्तांनी नाल्यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी पाहणी केल्यामुळे नाल्यांचा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मनपा आयुक्तांना माहिती दिली आहेविमानतळाच्या हद्दीतील नाले भूमिगत करण्याचे काम प्राधिकरण करीत आहे. विमानतळाच्या परिसरात वाहणा-या नाल्यांचा मार्ग वळविणे अथवा भूमिगत करण्याचे काम महापालिकेने केले पाहिजे. नाल्यांच्या प्रश्नासंदर्भात मनपा आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष नाल्यांची पाहणी केली आहे.- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ