लातूर : मान-सन्मानाचा वाद समाजात सतत वाढतो आहे. प्रसंगी भांडणे होतात. पण बापूंचे तेंव्हाच्या नेत्यांशी वाद असले तरी भांडणे नसत. द्वेष, मत्सर त्यांच्या ठायीच नव्हता. बापू अशा हिंसक वादापासून चारहात दूरच होते. इतरांना प्रेम-सौहार्द देण्यातच ते धन्यता मानत. ते अहिंसावादी होते, गांधी विचार जपला जावा. गांधी विचारांची आज देशाला नव्हे जगाला गरज आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी येथे केले. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने आयोजित ‘लेट अस किल गांधी’ या विषयावर ‘दयानंद’च्या सभागृहात व्याख्यान देताना रविवारी ते बोलत होते. मंचावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सुमती जगताप यांची उपस्थिती होती. तुषार गांधी म्हणाले, द्वेष मनातून जात नाही. गांधी हत्येच्या रुपाने तो समोर आला आहे. महात्मा गांधींना मारण्याचा पूर्वनियोजित कट होता. महात्मा गांधींची हत्या झाली असली, तरी गांधी विचाराची हत्या होऊ शकत नाही. कारण गांधी विचारात अहिंसेची ताकद आहे. बापूंचा हा विचार तरुण पिढीसमोर आणण्याची गरज आहे. मोहनदास करमचंद गांधी हा विषय केवळ पुस्तकापुरता मर्यादित नाही. गांधी कधी मारले जातात तर कधी जिवंत केले जातात. परंतु, सकारात्मक भावनेचा विचार अंगी बाळगून गांधी विचार जिवंत राहणे आवश्यक आहे. नेपोलियनच्या शब्दकोषात ‘अशक्य’ हा शब्द जसा नव्हता, तसा महात्मा गांधींच्या शब्दकोषात ‘सूड’ हा शब्द नव्हता. त्यामुळे शांततेच्या मार्गावरील गांधी विचार नव्याने कसा मांडता येईल, याचा विचार झाला पाहिजे. व्यक्तीपूजा ही महात्मा गांधींनाही मान्य नव्हती. म्हणूनच गांधी मरत नाहीत, त्यांना परत परत मारले जाते ही खरी शोकांतिका असल्याचे तुषार गांधी म्हणाले. व्याख्यानाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आमदार अमित देशमुख, माजी आ. पाशा पटेल, अॅड. त्र्यंबकदास झंवर, अतुल देऊळगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
गांधी विचारांची जगाला गरज : तुषार गांधी
By admin | Published: February 05, 2017 11:14 PM