औरंगाबाद: शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कौतुकही केले. भाजपसारख शिवसेनेला गर्दी जमवण्यासाठी नऊवारी साडी नेसून इव्हेंट करण्याची गरज नाही. शिवसेनेच्या सभांना गर्दी आपोआप होत असते, अशी टीका गोऱ्हे यांनी यावेळी केली.
'नामकरणाचा प्रस्ताव नाही तर...'औरंगाबादमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी नामांतराचा विषय काढल्याची टीका भाजपकडून होत आहे. त्यावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव आला नसल्याचे भाजप नेते म्हणत आहेत. नामकरणाचा प्रस्ताव आला नाही तर तुमच्या खासदार, आमदार, नगरसेवकांकडून प्रस्ताव पाठवावा, त्यांनी केंद्रामध्ये बैठक घ्यावी, त्यांनी त्याचे श्रेय घ्यावे', असे त्या म्हणाल्या.
'भाजपकडून राजकीय एन्काउंटर'त्या पुढे म्हणाल्या की, 'देवेंद्र फडणवीस मी परत यायला तयार आहेत, पण तसे होणार नाही. भाजपचा जो नेता म्हणतो मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्याचा राजकीय एन्काउंटर करण्याची भाजपची निती आहे. आम्हाला माणसं जमविण्यासाठी नववारी नेसुन इव्हेंट करावे लागत नाही,' अशी टीका त्यांनी केली. तसेच, 'शिवसेनेचे आमदार अभेद्य राहतील अशी अपेक्षा, निवडणूकांमध्ये आम्हाला यश मिळेल,' असा विश्वासही राज्यसभा निवडणुकांबाबत बोलून दाखवला.
पंकजा मुंडेचे कौतुकयावेळी गोऱ्हे यांनी राज्यसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांवर भाष्य केले. 'राज्यसभानंतर विधानपरिषद गणित कसं जमवायचे यासाठी आम्ही सक्षम आहोत. गोपीनाथ मुंडेंचा वारसा असलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदसाठी शुभेच्छा आहेत. मधल्या काळात ज्या लोकांना भाजपने विधान परिषदेवर घेतले, त्यापेक्षा पंकजा मुंडे यांचे काम नक्कीच चांगले आहे, त्यांना संधी मिळायलाच हवी,' असेही त्या म्हणाल्या.