औरंगाबाद : अवघ्या एका दिवसाच्या अंतराने केलेल्या तपासणीत एका रुग्णाचा घाटीतील तपासणी कोरोना अहवाल निगेटिव्ह, तर विद्यापीठातील प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
एन-२ येथील ५७ वर्षीय व्यक्तीस खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने १३ जुलै रोजी एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे स्वॅब दिला. त्रास वाढल्यामुळे त्यांना घाटीत दाखल केले. तेथेही त्यांचा स्वॅब घेण्यात आला. घाटीत तपासलेल्या स्वॅबचा अहवाल १४ जुलै रोजी निगेटिव्ह आला. एमजीएम केंद्राने १३ जुलै रोजी घेतलेल्या स्वॅबची १५ जुलैस विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यासंदर्भात मनपाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या कुटुंबियांना गुरुवारी माहिती दिली. तेव्हा त्यांना धक्काच बसला.
दोन वेगवेगळे अहवालअहवाल निगेटिव्ह आल्याने वडील घाटीत निगेटिव्ह वॉर्डात आहेत; पण गुरुवारी मनपाने ते पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. घाटीत निगेटिव्ह आणि विद्यापीठातील प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह, असे दोन वेगवेगळे अहवाल आले. -विकास, रुग्णाचा मुलगा
चूक होऊ शकत नाहीतपासणीत कुठलीही चूक होऊ शकत नाही. तीन ते चार वेळा पडताळणी केली जाते. त्यामुळे असे काही होऊ शकत नाही.- डॉ. गुलाब खेडकर, संचालक, विद्यापीठ प्रयोगशाळा
अनेक बाबी कारणीभूतअशा बाबीला अनेक बाबी कारणीभूत असतात. पॉझिटिव्ह अहवाल घाटीला पाठविला जाईल. ते उपचार सुरू ठेवतील.-डॉ. नीता पाडळकर, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी