औरंगाबाद : ‘एटीएम’मधून कमी पैसे मिळाल्याची तक्रार करूनही तिची दखल न घेतल्याप्रकरणी स्टेट बँक आॅफ हैदराबाद यांनी अर्जदार समाधान भगवान वानखेडे या विद्यार्थ्याला रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे प्रतिदिनी १०० रुपये दंड या हिशेबाने ४७७ दिवसांचे ४७ हजार ७०० रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी एक हजार रुपये एक महिन्यात देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि सदस्य किरण ठोळे व संध्या बारलिंगे यांनी दिले.
समाधान भगवान वानखेडे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने मंचात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, समाधान याने १ आॅक्टोबर २०१६ रोजी एसबीएचच्या एटीएममधून १५०० रुपये काढले. मात्र, मशीनमधून केवळ ११०० रुपयेच प्राप्त झाले. त्याने या संदर्भात ४ आॅक्टोबर रोजी बँकेकडे तक्रार दाखल केली. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अशा प्रकरणात सात दिवसांत तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक असताना बँकेने तक्रारींकडे दुर्लक्ष केले.
अर्जदाराने वारंवार सर्व संबंधितांकडे तक्रार अर्ज केले, विनंती केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, ५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याच्या खात्यात ४०० रुपये वर्ग करण्यात आले. या प्रकरणी सेवेतील त्रुटी, मानसिक त्रास, तक्रार खर्च, कायद्यानुसार भरपाई मिळण्याची विनंती अर्जदाराच्या वतीने करण्यात आली. सुनावणी वेळी प्रतिवादी बँकेला नोटीस देण्यात येऊनही त्यांच्यातर्फे कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने एकतर्फी सुनावणी घेऊन वरीलप्रमाणे आदेश दिला.