सीईओंची नाराजी : आदेश देऊन १० दिवस उलटले, सोमवारी अनुपालन सादर करा, गंभीर कारवाईचा इशारा
---
औरंगाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश २८ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, १० दिवस उलटूनही नियंत्रण कक्ष स्थापन न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच तत्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून सोमवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
डाॅ. गोंदावले शनिवारी कन्नड तालुक्याच्या दाैऱ्यावर होते. त्यात त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचे दिसले नाही. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातही तसेच चित्र असल्याचे येथील तालुका संपर्क अधिकाऱ्यांनी सीईओंच्या निदर्शनास आणून दिले. आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नियंत्रण कक्ष तत्काळ स्थापून तेथील नियुक्त कर्मचाऱ्यांनी सकाळी १० ते ५ या वेळेत गृहविलगीकरणातील व्यक्तीशी दिवसातून किमान एकवेळ तरी संपर्क करावा. विलगीकरण काळात तो घरातून बाहेर पडत नाही ना, याची खात्री करावी. ताप, लक्षणे, ऑक्सिजन पातळीची शहानिशा करावी. तसेच रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर न पडण्याच्या सूचना द्याव्यात. विनाविलंब आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही सीईओंनी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना दिला आहे.
---
संयुक्त दाैऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना
--
२८ एप्रिलला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विषेश पोलीस महानिरीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्त दाैरा करुन कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीची चाचपणी केली होती. त्यावेळी गृह विलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरताहेत, असे निदर्शनास आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नियंत्रण कक्ष गावातील शाळेत सुरु करुन प्रत्येक विलगीकरणातील व्यक्तीची विचारपूस करून त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार सीईओंनी आदेशही दिले होते. मात्र, सीईओंना आदेशाची अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.