पैठण : सात जन्माच्या गाठी बांधून वर्षभरापूर्वी विवाह बंधनात गुंफलेल्या दोन कोवळ्या जीवांनी घरातूनच होत असलेल्या अवहेलनेने पैठण येथील नाथसागराच्या जलाशयात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सोमवारी नाथसागरात सकाळी पत्नीचा तर सायंकाळी पतीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या जोडप्याने रूमालाने एकमेकाचे हात बांधून सोबतच जलाशयात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रथम दर्शनी अंदाज बांधला जात आहे. किर्ती सचिन लवांडे व सचिन विठ्ठल लवांडे रा. पाथर्डी जि. अहमदनगर असे नाथसागरात सापडलेल्या पती पत्नी चे नाव आहे.
आज सकाळी नाथसागरात पोहण्यासाठी गेलेल्या तरूणांना १८ वर्षीय तरूणीचे प्रेत जलाशयावर तरंगत असलेले आढळून आले. सायंकाळच्या सुमारास चिंचोली ता घनसावंगी येथील मुलीच्या माहेरच्यांनी सदर मुलगी बद्रीबापू खोसे यांची मुलगी असल्याचे फौजदार सचिन सानप व रामकृष्ण सागडे यांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी मृतदेह जलाशया बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रूग्णालयात हलवले. तरूणीचे नातेवाईक पैठण येथे पोहचेपर्यंत सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान एका तरूणाचा मृतदेह तरूणी ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी फुगुन वर आल्याची खबर आली. पोलिसांनी तातडीने मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात हलवला. तेव्हा नातेवाईकांनी दोघे पती पत्नी असल्याचा खुलासा करत हंबरडा फोडला.
एकमेकांवर जीवापाड प्रेमसचिन व किर्तीचा विवाह सहा महिण्यापूर्वी झाला. सचिन तीसगाव येथे स्टेशनरीचे दुकान चालवतो. सचिनचा मोठा भाऊ वैमानिक असून तो बेंगळुरू येथे नोकरीस आहे. सुखवस्तू घर असलेल्या लवांडे परिवारात कशाचीच कमी नव्हती मात्र किर्तीला घरात चांगली वागणूक मिळत नसल्याने सचिन व्यथित झालेला होता. रक्ताच्या नात्यातून होणाऱ्या जाचास प्रतिबंध सचिन करू शकत नसल्याने सचिनला काय करावे हेच समजत नव्हते. आपल्याला होणाऱ्या जाचाचा पतीला होणारा त्रास किर्तीही सहन करू शकत नव्हती असे किर्तीच्या नातेवाईकांनी सांगितले. दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत होते.