औरंगाबाद : रमजान ईद साजरी करण्यासाठी थकीत बिले मिळावीत या मागणीसाठी सोमवारपासून मनपातील कंत्राटदारांनी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. सध्या उष्णतेची लहर आहे. तापमान ४२.६ अंशांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम कंत्राटदार रोजा ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील दोन दिवसांमध्ये काही कंत्राटदारांची प्रकृतीही खालावली आहे. मागील दोन दिवसांमध्ये प्रशासनाने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी देयके अदा करण्याची कार्यवाही झाली नाही, तर पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक कामेही थांबविण्यात येणार आहेत.महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वाधिक फटका विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. तिजोरीत सध्या खडखडाट असल्यामुळे ठेकेदारांची जवळपास ३०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. उधारीवर साहित्य आणून कंत्राटदारांनी विकास कामे केली आहेत. थकीत बिले मिळावीत यासाठी १ वर्षापासून कंत्राटदार पाठपुरावा करीत आहेत. तिजोरीत पैसे नसल्याचे नाट्य प्रशासनाकडून रंगविण्यात येत आहे. नगररचना विभागासाठी स्वतंत्र खाते उघडले आहे. या खात्यात ६० कोटींहून अधिक रक्कम पडून आहे. याशिवाय शासनाकडून प्राप्त होणारी रक्कम गृहीत धरल्यास मनपा प्रशासन किमान १०० कोटी रुपयांची देयके अदा करू शकते; पण त्यासाठी इच्छाशक्तीच नाही.प्रशासनाच्या या अनास्थेमुळे कंत्राटदारांच्या पदरी केवळ आश्वासने पडत आहेत. कंत्राटदारांनी आयुक्त, महापौरांना घेराव, मनपा मुख्यालयासमोर निदर्शने, उपोषण अशा प्रकारे अनेक वेळा आंदोलने केली. तरीही बिले न मिळाल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत. सोमवारपासून या ठेकेदारांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारी प्रशासनाने निर्णय न घेतल्यास विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामेही बंद करण्यात येतील, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.
कंत्राटदारांच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:04 PM