औरंगाबाद : मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशातील रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घाटी रुग्णालयाचा कारभार सुधारताना दिसत नाही. सर्पदंश झालेल्या मुलाला घाटीत सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दाखल करताना पालकांना मनस्तापासह अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. घाटीतील रुग्णसेवेबाबत सर्वस्तरावरून टीका होत असली तरी या रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाही.
औरंगाबाद शहरातील मयूर पार्क येथील राजेश जोशी यांचा मुलगा सौरभ याला रात्री साडेदहाच्या सुमारास सर्पदंश झाला. उपचारार्थ त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत नेण्यात आले. अपघात विभागाजवळ स्ट्रेचर आणि वॉर्डबॉय उपलब्ध नसल्याने पालकांनीच मुलाला खांद्यावर घेत मेडिसिन बिल्डिंग गाठली. तेथे स्ट्रेचर मिळाले, पण स्टॅण्ड नसल्याने सलाईनची बाटली हातात घेऊन ते लिफ्टपर्यंत आले. तेथेही लिफ्ट बंद असल्याने सौरभला तिसऱ्या मजल्यापर्यंत खांद्यावर घेऊन ५ नंबर वॉर्डमध्ये जावे लागले. दरम्यान, सौरभला खांद्यावर घेतल्याने गडबडीत सलाईनच्या नळीत त्याचे रक्त आले. त्यानंतर सलानईची सुई निघाली.
घाटीच्या अपघात इमारतीपासून सुरू झालेला राजेश जोशी यांचा संघर्षाचा प्रवास मेडिसिन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक ५ पर्यंत सुरूच राहिला. तेथे दाखल केल्यानंतर सुदैवाने सर्प विषारी नसल्याने मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घाटी रुग्णालयातील प्रशासनाने रुग्णांना योग्य सेवा देण्यासह कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर राहतील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांतून होत आहे.