पैठण : मान्सूनपूर्व नालेसफाई न झाल्याने मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील अनेक वसाहतीतील घरादारात पाणी घुसल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, बुधवारी खडबडून जागे झालेल्या नगरपालिका प्रशासनाने वसाहतीतील पाणी बाहेर काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. परंतु, सायंकाळपर्यंत यंत्रणेला वसाहतीतून पाणी बाहेर काढण्यात यश आले नव्हते. पालिकेच्या दिरंगाईने घरादारात पाणी शिरलेल्या नागरिकांनी नगरपालिका कारभाराबाबत मोठा संताप व्यक्त केला.
मंगळवारी रात्री पैठण शहरात दोन तासात ५४ मीमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शशीविहार, पन्नालाल नगर, सराफ नगर, बालाजी नगर, कावसान या नगरी वसाहतीतील घरादारात नाल्याचे पाणी घुसले. इंदिरानगरमधून वाहणारा नाला शशिविहारच्या पुढे ब्लॉक झालेला आहे. नागरिकांनी पालिका प्रशासनास वेळोवेळी नालेसफाई करण्या बाबत कळविले होते. मान्सूनपूर्व नालेसफाई करणे गरजेचे असताना पालिका प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने सोमवारी झालेल्या पावसाचे पाणी अनेक वसाहतीत घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, पैठण नगर परिषद स्वच्छतेसाठी एका खाजगी संस्थेला दरमहा लाखो रूपये मोजत आहे. असे असतानाही सोमवारी नाल्या तुंबून अनेक सखल भागात पाणी साचल्याने नप कारभाराचे पितळ उघडे पडले. शशीविहार जलमय.. शशिविहार या हायप्रोफाईल वसाहतीसह परिसरातील सराफ नगर भागातील नागरिकांना पाणी साचल्याने सकाळी घरातून बाहेर पडणे सुध्दा शक्य झाले नाही. शशीविहारच्या प्रांगणात साचलेल्या पाण्यात विषारी साप आल्याने महिला व मुलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
सर्पमित्र बोलावून साप पकडलेसाचलेल्या पाण्यात अनेक विषारी साप फिरत होते, दरम्यान एक मोठा साप माझ्या घराच्या पायरीवर दिसून आला. या प्रकाराने घरातील सदस्य घाबरले शेवटी सर्पमित्र बोलावून घरासमोरील साप पकडावे लागले असे शशिविहारचे रहिवाशी असलेले संतोष राऊत, महादेव गायकवाड व अन्य रहिवाशांनी सांगितले.
मुख्याधिकारी शहरात असून पाहणी करण्यासाठी आले नाही
मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम नप ने केले नाही. शशिविहारच्या पुढे अनेकांनी नाल्यावर अतिक्रमण केले असून हे अतिक्रमण काढण्याची हिंमत नप प्रशासनात नसल्याने आज परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मुख्याधिकारी आज शहरात होते, त्यांना वारंवार बोलावून देखील ते परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले नाही. - भाऊसाहेब पिसे माजी उपनगराध्यक्ष पालिका पैठण.
पालिका यंत्रणेचे दिवसभर प्रयत्नपरिसरातील पाणी बाहेर काढण्यासाठी स्वच्छता सभापती ईश्वर दगडे, बंडू आंधळे, स्वच्छता निरीक्षक भगवान कुलकर्णी, व्यंकटी पापुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे बुधवारी नप पथकाचे दिवसभर प्रयत्न सुरू होते. मात्र, परिसरातील पाणी काढण्यात सायंकाळपर्यंत यश आले नव्हते.