याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सागर सखाराम कांबळे आणि गौतम दाभाडे अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सुभाष शंकर त्रिभुवन (४८, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) हे आणि आरोपी परस्परांच्या शेजारी राहतात. २२ ऑगस्ट रोजी रात्री सुभाष यांनी ऑनलाइन खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर घेऊन डिलेव्हरी बॉय त्यांच्या घरी आला होता. त्याला १५५ रुपये द्यायचे होते आणि त्यांच्याकडे २०० रुपयांची नोट होती. यामुळे त्रिभुवन हे शेजारच्या नात्याने आरोपींकडे सुटे पैसे आहेत का, असे विचारण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत आमच्याकडे बँक आहे का, असे म्हणून धक्काबुक्की करत लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. या घटनेविषयी सुभाष यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
----
हॉटेलच्या वादातून तरुणाला मारहाण
औरंगाबाद : हॉटेल चालविणारे कृष्णा पंडितराव सातपुते (३०, रा. रेणुकानगर, शिवाजीनगर) यांना पिता-पुत्राने मारहाण करून जखमी केले. ही घटना २३ ऑगस्ट रोजी क्रांती चौक पुलाजवळील कृषी विभाग कार्यालयाच्या आवारातील हॉटेलमध्ये घडली.
रत्नदीप ऊर्फ बॉबी दीपक विसपुते, दीपक विसपुते अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, कृष्णा पंडितराव सातपुते हे कृषी विभागाच्या कार्यालयाच्या आवारात हॉटेल चालवितात. २३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी तेथे आले आणि त्यांनी तू येथे हॉटेल कशी चालवितो, असे म्हणून भांडण सुरू केले. यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांना जखमी केले. शिवाय हॉटेलमधील साहित्याचे नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सहाय्यक उपनिरीक्षक एजाज शेख हे तपास करीत आहेत.