औरंगाबाद : उत्तरकाशीतील पवनहंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या बनावट वेबसाईटवरून औरंगाबाद जिल्ह्यातील ७० भक्तांनी केदारनाथ, बद्रीनाथ व इतर तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी ऑनलाईन हेलिकाॅप्टर सेवेसाठी बुकिंग केले. त्यापोटी ६ लाख रुपयांची रक्कमही भरली, परंतु हे भक्त गुप्तकाशीला पोहोचले, तेव्हा त्यांना ना हेलिकॉप्टर मिळाले ना भरलेली रक्कम परत मिळाली. डेहराडून येथील तहसीलदार व पवनहंस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे भक्तांच्या लक्षात आले.
हेलिकाॅप्टरने प्रवास लवकरात लवकर होणार असल्याचे समजून पुढील केलेल्या निवासाच्या बुकिंगचे गणित कोलमडले. त्यामुळे ७० यात्रेकरूंवर मिळेल त्या व्यवस्थेने यात्रा पूर्ण करण्याची वेळ आली. तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी विमान अथवा हेलिकॉप्टर सेवा ऑनलाईन माध्यमातून घेण्यापूर्वी वेबसाईटची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे.
चार दिवसांपूर्वी ७० जणांनी पवनहंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या वेबसाईटवरून हेलिकॉप्टरची तिकिटे बुक केली. त्यातील दोन तिकिटे व कन्फर्मेशनचा मेसेज एजंटने व्हाॅट्सॲपवर पाठविला. गुप्तकाशीतील एकाला ती तिकिटे खरी आहेत का, यासाठी पाठविली. ती तिकिटे खरी होती. त्यामुळे बाकीच्या सर्व तिकिटांची रक्कम ऑनलाईन भरली, परंतु ७० यात्रेकरू डेहराडूनला पाेहोचले, त्यावेळी पवनहंसच्या कार्यालयात यांच्या नावाची नोंदही नव्हती आणि तिकीटेही नव्हती. असाच प्रकार हरियाणासह इतर राज्यांतील भक्तांसोबत झाल्याचे देखील तेथे दिसले. त्यानंतर यात्रेकरूंनी मनोज बोरा व इतर मित्रपरिवारांशी सपंर्क करून हा प्रकार कळविला. त्यांनी सहकार मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना संपर्क करून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर यात्रेकरूंना पुढील प्रवासासाठी सहकार्य, मदतीचा प्रयत्न केला.
ऑनलाईन बुकिंग खात्रीपूर्वक कराएन-३मध्ये राहणारे गिरीश पांडे यांचाही त्या ७० यात्रेकरूंमध्ये समावेश आहे. ‘लोकमत’शी बोलताना पांडे यांनी सांगितले की, औरंगाबाद, वैजापूर, श्रीरामपूर, जालना येथील ७० जणांचे बुकिंग केले होते. ६ लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून दिले होते. दोन तिकिटे खरी पाठविली, उर्वरित डेहराडूनमध्ये कंपनीच्या काैंटरवर देणार असल्याचे कळविले, परंतु तेथे पाेहोचल्यावर आमची फसवणूक झाल्याचे समजले. पवनहंस कंपनीने देखील याबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार दिली आहे. यापुढे औरंगाबादच्या नागरिकांनी ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना खात्री करण्याचे आवाहन त्यांनी केले.