वाळूज महानगर : आॅनलाईन नेट बँकिंग सुविधेद्वारे कंपनीच्या खात्यातील ३८ लाख २१ हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबईच्या एका आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयकुमार कुलकर्णी यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत मे. महाराष्ट्र पेस्टीसाईड्स प्रा. लि. ही कंपनी आहे. नवी मुंबई येथे आॅफिस सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. कंपनीच्या एका संचालकाच्या ओळखीने जयवंत गणपत भोईर (रा. खारघर, नवी मुंबई) याने नवी मुंबईत गणपत भोईर यांचे आॅफिस संचालक मंडळाला दाखविले होते. संचालक मंडळाने ३८ लाख २१ हजार रुपयांत हे आॅफिस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला नोटरी करारनामा करून जयवंत भोईर यांना ३ लाख २१ हजार रुपये देण्यात आले. सदर आॅफिस सिडकोच्या अखत्यारीत असल्यामुळे सिडकोची परवानगी घेऊन खरेदी- विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा निर्णय संचालक मंडळ व जयवंत भोईर यांच्यात झाला होता. दरम्यानच्या काळात जयवंतने कुलकर्णी व संचालक मंडळाचा विश्वास संपादन करून आॅनलाईन नेट बँकिंगद्वारे १९ व २३ नोव्हेंबरला प्रत्येकी ५ लाख रुपये, तसेच १३ डिसेंबरला २५ लाख रुपये काढून घेतले होते. कंपनीच्या खात्यातून पैसेही काढून घेतले, तसेच आॅफिसही देत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यामुळे कुलकर्णी यांनी आज एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दिली. जयवंतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय अहिरे करीत आहेत.
नेट बँकिंगद्वारे ३८ लाख रुपये काढले
By admin | Published: September 16, 2014 1:12 AM