दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे. याकडे फिरत्या पथकासह बैठे पथकाचे दुर्लक्ष होत असल्याने पथकाची भूमिका केवळ नावालाच उरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दहावी तसेच बारावी परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचे शिक्षण विभागाने ठरविले असले तरी त्याच विभागातही काही महाभागांमुळे दोन्ही परीक्षेत कॉप्याच कॉप्या दिसत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर सर्रास कॉप्यांचा वापर सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील अनेक केंद्रावर कॉप्या सुरू असल्याने कॉपीमुक्त अभियाना कागदावरच दिसून येत आहे. येथील केंद्रावर गुरूवारी भूमितीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह पालकांनी केंद्राबाहेर एकच गर्दी केली होती. गावातील परीक्षा केंद्रावर पेपरला सुरूवात होताच अनेकांनी वर्गखोल्यांच्या खिडकीजवळ जाऊन पाल्यांना कॉपी पुरविण्याचे काम सुरू होते.अनेकजण थेट खिडकीतून कॉपी देत असताना बैठे पथक, भरारी पथक व पोलिस यंत्रणेचे कायम याकडे दुर्लक्ष होत होते. अनेकांनी तर प्रश्न पत्रिकाच बाहेर आणून गाईड मध्ये प्रश्नांची उत्तरे शोधत असल्याचे विदारक चित्र केंद्राबाहेर दिसून आले. दहावीची परीक्षा म्हणजे पुढच्या वर्गाचा टर्निग पॉईट ठरतो. परंतु जर अशा प्रकारे कॉपी करून विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत मजल मारणार अशी चर्चा काही नागरिकांतून व्यक्त होत आहे. दाभाडी येथील परीक्षा केंद्र कॉप्यांचे केंद्रच झाल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले. प्रत्येक वर्गाच्या खिडकीजवळ कॉपी देण्यासाठी तरूण सज्ज होते. शाळेच्या बाहेरही शेकडो तरूण दिवसभर तळ ठोकून होते. कॉपीचा दुरगामी परीणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. परंतु याकडे संबंधित विद्यालयाचे आणि शिक्षणविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने कॉप्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची गरज सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे. कॉपी पुरविणारे जास्त असल्याने पोलीसही हातबल झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
कॉप्यांचा सुळसुळाट प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: March 17, 2017 12:33 AM