लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. विस्तारित रणाबरोबर नव्या विमानांच्या उड्डाणाची प्रतीक्षा केली जात असून, विमानतळ प्राधिकरणाकडून त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हवाई कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुराव्याचे ‘टेकआॅफ’ मिळाले, तर नव्या विमानसेवेचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे. विमानतळावरून गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत एका विमान कंपनीची सेवा बंद झाली, तर एका नव्या विमान कंपनीकडून सेवा सुरू झाली. एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. मागील दोन वर्षांपासून विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत.देशातील पर्यटनस्थळांबरोबर अनेक शहरे हवाई सेवेने औरंगाबादशी जोडलेले नाहीत. परिणामी, केवळ हवाईसेवेअभावी औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यनस्थळांना भेट देता येत नाही. त्याचा औरंगाबादेतील पर्यटक संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यासाठी राजकीय पातळीवर पाठपुरावा वाढविण्याची गरज आहे.
नव्या हवाई कनेक्टिव्हिटीला हवे पाठपुराव्याचे ‘टेकआॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:12 AM