- विजय सरवदे
औरंगाबाद : ‘कोरोना’च्या भीतीपोटी बहुसंख्य परप्रांतीय मजूर गावी निघून गेल्यामुळे नवीन बीड बायपासच्या कामाची गती मंदावली आहे. सध्या हे काम बंद नसले तरी स्थानिक मजुरांच्या माध्यमातून हळूहळू सुरू आहे. येत्या काही दिवसांत परप्रांतीय मजूर कामावर परतले तर जून २०२१ पर्यंत नवीन बायपास वाहतुकीसाठी सज्ज होऊ शकतो.
झाल्टा फाट्यापासून गेलेला सध्याचा बीड बायपास आता शहरात आलेला आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, २० वर्षांत शहराचा झपाट्याने होणारा विकास व विस्तार आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये उद्योग आल्यानंतर आताचे बायपास शहरामध्येच येतील. या उद्देशाने नवीन बायपासचे काम हाती घेण्यात आले. हा बायपास डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे कंत्राटदाराला काम अर्ध्यावरच थांबवावे लागले. त्यानंतर कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांनी कोरोनाच्या भीतीपोटी गावाचा रस्ता धरला. शासनाच्या सूचनेनुसार कामे सुरू करण्यात आली; पण त्यासाठी मजुरांची अडचण आली आहे. आता निपाणी ते करोडी आणि करोडी ते कन्नड घाटापर्यंतचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केले आहे. जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते.
सोलापूर-कन्नड महामार्ग जून अखेरपर्यंतसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशी ते औरंगाबाद (टप्पा क्रमांक दोन) या जवळपास १९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मे २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या कामालाही लॉकडाऊनचा फटका बसला. जून २०२१ पर्यंत सोलापूर-कन्नड महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.
भूसंपादनाचे अडथळे संपलेऔरंगाबादपासून कन्नड या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु कोविड-१९ मुळे या महामार्गाचे काम शासन आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. हा महामार्ग आता तो जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, पुन्हा लॉकडाऊनची अडचण येऊ नये. रस्त्यावरील भूसंपादनाचे सर्व अडथळे निकाली निघाले आहेत. काही आक्षेप येत आहेत. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आक्षेप येतच राहतील. त्याचा कामावर परिणाम होणार नाही. - अजय गाडेकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण