बीड : जिल्हा परिषदेचे नुतन सीईओ नामदेव ननावरे यांनी मंगळवारी ‘झाडू अन् झडती’च्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेचा नवा अध्याय सुरू केला. स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून सुरू केली पाहिजे ही बाब ओळखून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहीमेचा प्रारंभ केला. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, उपाध्यक्ष आशा संजय दौंड, सभापती बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, महेंद्र गर्जे, कमलाकर मुंडे यांनी स्वच्छता मोहीमेत केवळ हजेरी लावली नाही तर स्वत: झाडू हातात घेतला. सीईओ ननावरे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.एम. ढोकणे यांनीही साफसफाईत सहभाग घेतला. जि.प.च्या पाठीमागील बाजूस असलेल्या पशुसंवर्धन व ग्रामीण पाणीपुरवठा विभागापासून स्वच्छतेला सुरूवात झाली.केरकचरा, कागद, प्लास्टीक व इतर टाकावू वस्तूंची विल्हेवाट करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसर अवघ्या एका तासाच्या आत श्रमदानामुळे चकाचक झाला. त्यानंतर समाजकल्याण, लघुपाटबंधारे, महिला व बालकल्याण विभागाच्या आवारातील साफसफाई करण्यात आली. पदाधिकाऱ्यांसोबत खुद्द सीईओ ननावरे परिसर स्वच्छ करीत असल्याचे पाहून अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांनी टेबलावरील फाईल बाजूला सारून लगबगीने कार्यालयीच कर्मचाऱ्यांच्या लवाजम्यासह स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. परिसर स्वच्छ ठेवा स्वच्छता अभियाना दरम्यान सीईओ ननावरे यांनी विविध विभागांना भेटी दिल्या. यावेळी कार्यालयातील कोपरे पान, गुटख्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले आढळून आले. कार्यालयासह परिसरातील अस्वच्छता पाहून ननावरे यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छता पाळा असा संदेश त्यांनी दिला. स्वच्छते बरोबर विभागांची झाडाझडती घेऊन सीईओ ननावरे यांनी कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. लेखा विभागातही झाडाझडतीसीईओ ननावरे यांनी सायंकाळी ५ वाजता वित्त व लेखा विभागास भेट दिली. यावेळी काही कर्मचारी खुर्चीत नव्हते. पेन्डन्सी चालणार नाही, नोंदी व्यवस्थित ठेवा, हलगर्जीपणा करणाऱ्यांची गैर नाही, अशा विविध सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नियमबाह्य कामे थांबवा, निवृत्तीधारकासह इतर प्रलंबित कामे मार्गी लावा अन्यथा कारवाईला समोर जा, असा सूचक इशारा त्यांनी कॅफो वसंत जाधवर यांना दिला. (प्रतिनिधी)
नूतन सीईओंची जिल्हा परिषदेत ‘झाडू अन् झाडाझडती’
By admin | Published: November 26, 2014 12:24 AM