लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक मंगळवारी मुंबईहून औरंगाबादला विमानाने आले. विमान प्रवासात त्यांनी सर्व प्रवाशांना स्वत:ची ओळख करून दिली. सर्व प्रवाशांना त्यांनी एक कोरा कागद दिला. या कागदावर शहरात काय हवे, समस्या काय ही लिहून द्यावी, अशी विनंती केली. सर्व प्रवाशांनी आयुक्तांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ३० पेक्षा अधिक नागरिकांनी शहराबद्दल आपले मत व्यक्त केले.तीन महिन्यांनंतर मंगळवारी शहराला नवीन मनपा आयुक्त मिळाले आहेत. डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी मुंबईहून औरंगाबादकडे विमानाने येत असताना भन्नाट शक्कल लढविली. विमान प्रवासात वायफळ गप्पा मारण्यापेक्षा त्यांना एक युक्ती सुचली. एअर हॉस्टेस ज्या पद्धतीने अनाउन्समेंट करतात त्या पद्धतीने त्यांनी सर्व प्रवाशांना आपली ओळख करून दिली. मी तुमच्या शहराचा नवीन मनपा आयुक्त आहे, आपल्याला देण्यात आलेल्या कोऱ्या चिठ्ठ्यांवर मनपाकडून असलेल्या अपेक्षा लिहून द्या. आयुक्तांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रवाशांना सुखद धक्का बसला. प्रवाशांनीही तातडीने आपल्या अपेक्षा लिहून दिल्या. जवळपास तीस जणांनी नव्या आयुक्तांकडे अपेक्षा आणि सूचना लिहून दिल्या. त्यातील काही सूचना खूप आवडल्याचे सायंकाळी पत्रकारांसोबत गप्पा मारताना त्यांनी सांगितले. नागरिकांनी दिलेल्या चिठ्ठ्याही त्यांनी दाखविल्या.नागरिकांच्या अपेक्षा खूप आहेत. एका दिवसात सर्व प्रश्न सोडविणेही अशक्य आहे. हळूहळू प्रत्येक प्रश्नात लक्ष घालून तो सोडवून घेण्यावर अधिक भर राहणार आहे. मनपाची गेलेली पत परत आणण्यासाठी संपूर्ण प्रशासन काम करणार आहे.ट्विटर अकाऊंटनागरिकांसोबत संपर्कात राहण्यासाठी आपण ट्विटरवर नवीन अकाऊंट उघडला आहे. यावर नागरिकांनी सूचना मांडाव्यात, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले.
नव्या आयुक्तांनी विमानात घेतल्या जनतेच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:37 AM