औरंगाबाद : स्पाईस जेटकडून ८ आॅक्टोबरपासून सकाळच्या वेळेत दररोज औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू केली जाणार आहे. तर सध्या सायंकाळच्या वेळेत एअर इंडियाची दिल्ली-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू आहे. यामुळे एका दिवसात दिल्ली, औरंगाबाद दर्शन करता येईल. म्हणजे दिल्लीला सकाळी जाऊन सायंकाळी विमानाने परत येणे शक्य होणार आहे. याचा देश-विदेशातील पर्यटकांबरोबर लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांना फायदा होणार आहे.
दिल्लीहून सकाळी ६ वाजता उड्डाण घेतल्यानंतर सकाळी ७.५० वाजता स्पाईस जेटचे विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर औरंगाबादहून सकाळी ८.२० वाजता विमान उड्डाण घेईल आणि सकाळी १०.२० वाजता दिल्लीत दाखल होईल. औरंगाबादहून सध्या एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद-दिल्ली आणि दिल्ली - औरंगाबाद - मुंबई या विमानसेवेने शहर दिल्ली, मुंबई शहराबरोबर हवाई सेवेने जोडलेले आहे.
विमानाने सकाळी दिल्लीत जाऊन त्याच दिवशी सायंकाळी परत येणे नव्या विमानसेवेमुळे शक्य होणार आहे. या नव्या विमानसेवेचा सर्वाधिक फायदा दिल्लीहून पर्यटनासाठी औरंगाबादला येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. सकाळी ८ वाजता औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणीला भेट देऊन सायंकाळी परत जाणे शक्य होणार आहे. ही बाब समोर ठेवून स्पाईस जेटकडून विमानसेवा पर्यटकांसाठी ठेवली जात आहे. औरंगाबादेतील बीबीका मकबरा, दौलताबाद किल्ला, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिराची माहिती प्रवासी पर्यटकांना दिली जात आहे. स्पाईस जेटच्या विमानसेवेमुळे आॅक्टोबरपासून दिल्लीची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. विशेष म्हणजे सकाळच्या वेळेत दिल्लीसाठी विमान सुरू होत आहे. त्यामुळे विविध क्षेत्राला ही विमानसेवा फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईसाठी सकाळचे विमान सुरु व्हावे दिल्लीहून सकाळी औरंगाबादला येऊन वेरूळ, अजिंठ्याला भेट देऊन पुन्हा सायंकाळी दिल्लीला जाणे पर्यटकांना शक्य होईल. औरंगाबादहून दिल्लीला गेल्यानंतर त्याच दिवशी दिल्लीहून विमानाने परत येता येईल. परंतु दिल्लीत काही मोजकेच तास थांबता येईल. सध्या अनेक जण मुंबईमार्गे औरंगाबादला येतात. त्यामुळे मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमान सुरू होणे गरजेचे आहे.- आशुतोष बडवे, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ औरंगाबाद