औरंगाबाद : अनेक आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पंच म्हणून यशस्वीपणे कामगिरी बजावणारे तसेच या खेळाचे एनआयएस प्रशिक्षक डॉ. दयानंद कांबळे यांनी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या क्रीडा संचालकाचा पदभार आज दुपारी ४.३० वाजता स्वीकारला.१ नोव्हेंबर रोजी डॉ. प्रदीप दुबे यांनी विद्यापीठाच्या क्रीडा संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तब्बल दोन आठवडे पद रिक्त होते. त्यामुळे खेळाडूंना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले होते. एवढेच नव्हे तर उंबरठ्यावर आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा असतानाही हा संघ सहभागी होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. अखेर यात एका क्रीडा संचालकाने स्वत:च्या जबाबदारीवर या स्पर्धेसाठी लागणारा खर्च घेतल्यामुळे विद्यापीठाचा बॉक्सिंग संघ चंदीगड येथे १८ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे. प्रदीप दुबे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी कुलगुरूंना निवेदन देऊन या पदावर स्थानिक महाविद्यालयातील क्रीडा संचालकाची नियुक्ती करावी याविषयी निवेदनही दिले होते. त्यानंतरही लवकर निर्णय घेण्यात आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी डॉ. दयानंद कांबळे यांच्यासह याआधी प्रभारी क्रीडा संचालकपद भूषवणारे डॉ. उदय डोंगरे, मौलाना आझाद येथील डॉ. एम.ए. बारी, विवेकानंद महाविद्यालयाचे डॉ. गोविंद कदम हेदेखील शर्यतीत होते; परंतु अखेर डॉ. दयानंद कांबळे यांच्या नावावर कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी दुपारी १.३० वाजता आज शिक्कामोर्तब झाले. प्रदीप दुबे हे क्रीडा संचालक असताना त्यांनी तब्बल १२ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून बंद पडलेला आॅलिम्पिक आकाराचा स्विमिंग पूल सुरू करण्यात विशेष पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले होते. तसेच अनेक आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठ स्पर्धेचीही यशस्वीपणे आयोजन केले होते. तसेच त्यांच्या काळात विद्यापीठाच्या कबड्डी, बॅडमिंटन व बास्केटबॉल संघाने विशेष कामगिरी केली होती; परंतु आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास अग्रिम रक्कम घेण्यापासून ते संघ पाठविण्यापर्यंत अनेक अडथळे येत असल्यामुळे त्यांनी अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.आता विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या क्रीडा संचालकाचा पदभार स्वीकारणारे डॉ. दयानंद कांबळे हे अॅथलेटिक्स खेळातील एनआयएस प्रशिक्षक आहेत. तसेच त्यांनी २०१० साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तांत्रिक पंच आणि याचवर्षी ओडिशा येथे झालेल्या एशियन अॅथलेटिक्स स्पर्धेत तांत्रिक पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पेलली आहे. तसेच त्यांच्या स्पर्धा आयोजित करणे व त्या यशस्वीपणे पार पाडणे याचे कौशल्यही त्यांच्यात आहेत.
दयानंद कांबळे विद्यापीठाचे नवीन प्रभारी क्रीडा संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 9:12 PM