औरंगाबाद : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हितास समान संधी देत मातृभाषेतून शिक्षणाची संधी देणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे ज्ञानाचा विस्तार आणि अंगीकार झपाट्याने होईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील माजी शिक्षिका विनता गर्दे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ऋणानुबंध या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘नवे शैक्षणिक धोरण, संधी आणि आव्हाने’ या विषयावर खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपले विचार मांडले. शिक्षिका रूपाली पाटील यांनी विनता गर्दे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. स.भु माजी विद्यार्थी संघटनेचे प्रसाद कोकीळ यांनी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचा परिचय करून दिला.
यावेळी डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, इंग्रज शिक्षणतज्ज्ञ मॅकॉले यांनी भारतात लागू केलेल्या शिक्षणपद्धतीतून मुक्तीचा महामार्ग नवे शैक्षणिक धोरण ठरू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार या धोरणात आहे. त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता होणार आहे. संस्थात्मक प्रगतीचा विचार करताना ज्ञानदानाचा मुखवटा पांघरुण केवळ पैशाच्या मागे धावणाऱ्या शैक्षणिक संस्थांना या धोरणामुळे चाप बसणार आहे. शालेय शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणाबाबत हे धोरणे प्रगतीकडे नेणारे आहे. पीएच.डी.च्या माध्यमातून समोर आलेली तथ्ये प्रत्यक्षात उतरवण्याची संधी संशोधकाला मिळणार आहे.
या व्याख्यानास सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या संघटनेचे माजी विद्यार्थी उमेश दाशरथी, प्रशांत देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. सुनील देशपांडे, आशिष गर्दे, सुहास वैद्य यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. प्रमोद माने यांनी आभार मानले.