छत्रपती संभाजीनगर : आजचा दिवस माझ्या आयुष्यात सुवर्ण दिवस ठरला... सकाळी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले... दुपारी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तुफान गर्दी अनुभवत ‘लोकमत’ भवनमध्ये दाखल झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो, आजच्या दिवसाच्या सुपरहिट क्लायमॅक्सने ‘नवऊर्जा’ मिळाली. पुढील आयुष्यभर मला ही ऊर्जा नवप्रेरणा देत राहील, अशा शब्दात ‘छावा’ चित्रपटातील अभिनेता विक्की कौशल याने आपली भावना व्यक्त केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील बहुचर्चित, बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट ‘छावा’च्या प्रमोशनसाठी गुरुवारी शहरात छावा फेम विक्की कौशल या ऐतिहासिक शहरात पहिल्यांदा आला होता. सायंकाळी ‘लोकमत’ भवनमध्ये त्याचे तुतारीचा निनाद आणि ढोल-ताशांच्या गजराने जोरदार स्वागत करण्यात आले. मराठमोळ्या वेशभूषेतील तरुण-तरुणींनी ‘विक्की’ कौशलवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली. व्यासपीठावर ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक करण दर्डा व लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा यांनी पुष्पगुछ देऊन ‘विक्की कौशल’चे स्वागत केले.
केशरी लालसर कुर्ता व काळ्या रंगाची पँट अशा साध्या वेशभूषेत आलेल्या विक्कीने ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘ हर हर महादेव’ अशी सिंहगर्जना केली आणि उपस्थितांनी तेवढ्याच जोशात साथ दिली. ‘कसे काय मंडळी, मराठी किती गोड भाषा आहे ना’, असा संवाद साधत त्याने सर्वांची मने जिंकली. ‘छत्रपती संभाजीनगरकर ‘हाऊ इज द जोश’ हा ‘उरी’ चित्रपटातील डायलॉग म्हटला तेव्हा उपस्थितांनी ‘हाय सर’ असे प्रतिउत्तर दिले.
यावेळी रुचिरा दर्डा यांनी प्रश्न विचारले आणि विक्की कौशल यांनी ‘छावा’ चित्रपट करतानाचे अनुभव सर्वांसमोर शेअर केले.
प्रश्न : ‘छावा’ चित्रपटाचा तुमचा अनुभव कसा राहिला ?विक्की : मी मुंबईचा मुलगा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मला माहिती आहेत. सर्वांच्या मनामनांत, रगारगांत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. छावा चित्रपटाचा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. खऱ्या अर्थाने माझे जीवन समृद्ध केले.
प्रश्न : छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी काय प्रयत्न केले?विक्की : छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणे सर्वांत कठीण काम होते. तयारीसाठी मला खूप वेळ द्यावा लागला. तथ्य मांडण्यासाठी चार वर्षांपासून चित्रपटावर लेखक, दिग्दर्शक अन्य टीमचा अभ्यास सुरू होता. दीड वर्षापासून चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. त्याआधी संभाजी महाराजांसारखी शरीरयष्टी निर्माण करण्यासाठी सात महिन्यांचा वेळ द्यावा लागला. या काळात २५ किलो वजन वाढविले. घोडस्वारी, तलवारबाजी शिकलो. त्यानंतर शुटिंगला सुरुवात केली. शिस्तीचे जीवन मी शिकलो.
प्रश्न : ऐतिहासिक चित्रपटाचा संशोधन व अभ्यास कसा प्रकारे केला?विक्की : प्रॉडक्शन डिझाइनर, कास्च्युम डिझाइनर, ॲक्शन डायरेक्टर यांनी दीड वर्षात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये ज्या-ज्या स्थळांचा उल्लेख आला, तिथे तिथे जाऊन आलो. त्या किल्ल्यांचा अभ्यास केला. आर्किटेक्टशी चर्चा केली. तोच सूक्ष्म अभ्यास सेट बनविताना कामी आला. पोशाख स्थानिक विणकरांकडून बनवून घेतला. चित्रपट उभा करण्यासाठी चार वर्षांचा काळ लागला.
प्रश्न : चित्रपटातील कोणते दृश्य तुमच्या हृदयाला भिडले?विक्की : ‘छावा’ चित्रपटातील सर्व दृश्ये मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यातील ‘राज्याभिषेका’चा सोहळा हृदयाला भिडला. ते दृश्य शहारे आणणारे ठरले. ३५० वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटले. आम्ही छत्रपतींची प्रार्थना करून शुटिंगला सुरुवात करीत होतो.
प्रश्न : प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहे?विक्की : ‘छावा’ चित्रपट बघण्यासाठी सहकुटुंब चित्रपटगृहात या. विक्की कौशलसाठी येऊ नका, तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा बघण्यासाठी या. त्यांनी दिलेले बलिदान, त्यांची शौर्यगाथा नवपिढीपर्यंत, देशातच नव्हे तर विदेशात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी, हाच उद्देश होय.
प्रश्न : तुम्हाला काय आवडते?विक्की : मला पाणीपुरी खाणे जास्त आवडते. त्यानंतर मिसळपाव माझे फेव्हरिट आहे.
प्रश्न : आपला फेव्हरिट चित्रपट कोणताविक्की : लगान, उरी, बॉर्डर व छावा हे माझे सर्वांत पसंतीचे चित्रपट आहेत.
प्रश्न : सुटीच्या दिवशी आपली दिनचर्या कशी असते?विक्की : मी सुटीच्या दिवशी कुटुंबाला संपूर्ण वेळ देतो. त्या दिवशी पोट भरून जेवतो आणि मस्त झोपही काढतो.
विक्की म्हणाला, ‘लोकमत’चा पत्रकार बनायला आवडेल.रुचिरा दर्डा यांनी विक्की कौशलला प्रश्न केला की, भविष्यात काय बनायला आवडेल?विक्कीने लगेच उत्तर दिले, भविष्यात मला ‘लोकमत’चा पत्रकार बनण्यास आवडेल. माझ्या चित्रपटावर मीच लेखन करायचे हा अनुभवच खूप आनंददायी ठरेल.
१४ फेब्रुवारीला ‘छावा दिवस’ साजरा करादरवर्षी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा करतात. पण, यंदा तुम्ही त्या दिवशी ‘व्हॅलेन्टाईन डे’ नव्हे, तर ‘छावा’ दिवस साजरा करा, असे आवाहन अभिनेता विक्की कौशल यांनी सर्वांना केले.
सक्सेस पार्टीला रश्मिका मंदानाला घेऊन येणारविक्की कौशल यांनी सांगितले की, महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ ही आज छत्रपती संभाजीनगरात येणार होती. मात्र, तिच्या पायाला मार लागल्याने ती येऊ शकली नाही. मात्र, पुढील वेळीस नक्की ‘लोकमत’मध्ये ‘रश्मिका’ला घेऊन येईन व छावा चित्रपटाची सक्सेस पार्टी धडाक्यात साजरी करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
माझी तुलना देवाशी करू नकाएका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला विक्की कौशलने उत्तर दिले की, माणसाची तुलना माणसाशी केली जाते. देवाशी केली जात नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे देव आहेत त्यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही.