सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या नवीन फंड्याविषयी प्राप्त माहिती अशी की, सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणूक करून सामान्यांना गंडवत असतात. बँक अधिकारी बोलत असल्याची थाप मारून एटीएम कार्ड नूतनीकरण करण्याच्या बहाण्याने ओटीपी विचारून बँकेतील रक्कम काढून घेतात. फसवणुकीचा हा फंडा नागरिकांना माहीत झाल्यावर नागरिक सतर्क झाले आहेत. यामुळे बँकेशी संबंधित कोणतीही माहिती नागरिक सायबर गुन्हेगारांना फोनवरून सांगत नाही. यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक परस्पर बदलून नागरिकांच्या नावे ऑनलाईन बँक अकाउंट उघडत आहेत. याकरिता ते सर्वप्रथम नागरिकांचा आधार क्रमांक मिळवून आधार कार्डशी सलग्न मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार इंडियाला रिक्वेस्ट पाठवितात. यानंतर त्या क्रमांकावर कॉल करून तुमचा आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक अपडेट करायचा असल्याची थाप मारून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारतात. हा कॉल बँकेशी संबंधित नसल्याचे समजून नागरिक ओटीपी क्रमांक सांगतात. यानंतर आरोपी त्यांचा मोबाईल क्रमांक नागरिकांच्या आधारकार्डशी संलग्न करतात. या आधारे ते ऑनलाईन बँक खाते उघडतात.
केवायसी पडताळणीकडे बँकेचे दुर्लक्ष
आपल्याकडे ऑनलाईन बँक खाते उघडण्यासाठी बँकांची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. विविध खासगी बँका ग्राहकांना ई मेल करून आणि मोबाईलवर मेसेज पाठवून झिरो बॅलन्सवर बँक खाते उघडा, असे सांगतात. जास्तीत जास्त खाते उघडण्यासाठी ते ग्राहकांच्या केवायसी पडताळणीकडे दुर्लक्ष करतात. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.
==========
दोन तरुणांचे नोएडा आणि आसाममध्ये बँकेत खाते
सायबर पोलिसांना प्राप्त झालेल्या दोन तक्रारींत शहरातील एका तरुणाचे उत्तर प्रदेशातील नोएडा येथे, तर दुसऱ्याचे आसाममध्ये परस्पर ऑनलाईन बँक खाते उघडण्यात आले. ही बाब तक्रारदार यांना समजल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांची भेट घेऊन तक्रारी दाखल केल्या.
=================
बँकांकडे मागितली माहिती
ऑनलाईन बँक खाते उघडताना ग्राहकाच्या केवायसीची पडताळणी कशी करता, याविषयीची माहिती सायबर पोलिसांनी मागितली असल्याचे सूत्राने सांगितले.