औरंगाबाद : ऑरिक सिटीत केंद्राच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार मागणी केलेले उद्योग यावेत, अशी मागणी या अगोदरच करण्यात आलेली आहे. आता पुन्हा उद्या निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे आमचे अधिकारी यासंबंधीची मागणी करणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये केंद्र शासन पुरस्कृत इलेक्ट्रॉनिक पार्क, फूड पार्क तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग यावे म्हणून पाठपुरावा करण्यात आला आहे. अमिताभ कांत यांच्याकडे पुन्हा एकदा मागणी करण्यात येणार आहे, तर संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटींचा निधी देण्यात आला आहे. लसीकरणासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, २१ जूनपासून केंद्राच्या नवीन धोरणानुसार प्रत्येकाला लस देण्यात येईल. जिल्ह्याचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार असून, ६ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी ३०० व्हेंटिलेटरसह खाटांची सुविधा करण्यात येत आहे. ११ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येतील. त्यातील ४ सुरू झाले आहेत. खासगी रुग्णालयांच्या बिल प्रकरणी अनेक तक्रारी होत्या. ५७ लेखापरीक्षक नेमून बिलांची तपासणी करण्यात आली. ९७ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १५ रुग्णालयांनी जास्तीचे बिल वसूल केले होते. त्यांच्याकडून ६५ लाख रुपये वसूल केले. पत्रकार परिषदेला आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते.
नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण होणारशहरासाठी १६८० कोटींंची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तीन वर्षांत ही योजना पूर्ण होईल. डिसेंबर २०२१ पर्यंत २०, मार्च २०२२ पर्यंत शहरासाठी अतिरिक्त ३० एमएलडी पाणी वाढविण्यात येईल. नवीन योजनेत शहराचा काेणताही भाग पाण्याविना राहणार नाही. खाम नदीपात्रात मनपाकडून सुरू असलेल्या कामाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
औरंगाबाद-शिर्डीचे रस्त्याचे लवकरच कामऔरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. ८८ कि.मी. रस्त्याचे काम झाल्यावर पर्यटक, भाविकांची सोय होईल. औरंगाबाद शहरालाही याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याचे कामाची वर्क ऑर्डर ऑक्टोबरपर्यंत दिली जाईल. नगरनाका ते केंब्रीज १४ कि.मी. रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. बीड बायपासचे काम ऑगस्ट २१ मध्ये संपेल. फर्दापूर घाटातील रस्ता डिसेंबरपर्यंत होईल.