छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरवादी विचार नव्या पिढीपर्यंत नव्या मार्गाने पोहोचविण्यासाठी नवीन पिढी आता कात टाकतेय. ई-कॉमर्स बिझनेस, रॅप, स्टँड अप कॉमेडी, फ्लॅश मॉब, कॉमिक्स, गझल यात पारंगत होत तरुणाई समर्पित भावनेने आंबेडकरी विचार 'जनरेशन-झेड' पर्यंत नेत आहे. विशेष म्हणजे, याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सोशल मिडियात या आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स मिळत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्रचार-प्रसार समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्यात अनेक कवी, गीतकार, गायक, जलसेकार ह्यांचा फार मोठा वाटा आहे. आता सर्वसामान्य लोकांसह नव्या पिढीपर्यंत आंबेडकरवाद पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या तरुणाईसोबत प्रातिनिधिक स्वरूपात ‘लोकमत’ने संवाद साधला.
आंबेडकरी विचारांची ई-कॉमर्सवर छाप : निखिल बोर्डेबहुजनांच्या भावनांचा आदर करत आंबेडकरी विचार लाईफ स्टाईलमध्ये दिसावा म्हणून 'बोधितत्व' या पहिल्या आंबेडकरी ब्रॅंडची निर्मिती छत्रपती संभाजीनगरच्या निखिल बोर्डे याने केली आहे. सुरुवातीला आम्ही आंबेडकरी विचार असलेली टी शर्ट, बाबासाहेबांच्या सहीचे पेन, ब्रोच, टोप्याचे उत्पादन केले. फ्रँचाईज बेस मॉडेलमधून निखिलने अनेक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे, फ्रँचाईज घेणाऱ्यात तरुणी जास्त आहेत. लवकरच सर्व प्रकारचे आंबेडकरी साहित्य 'बोधितत्त्व' या एकाच ब्रॅंड खाली घरपोच उपलब्ध होतील, असे निखिलने सांगितले.
विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन: अंकुर तांगडे'स्टँड अप कॉमेडी' या पुरुषी मक्तेदारी क्षेत्रात मूळच्या बीडच्या असलेल्या अंकुर तांगडे हिने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. उच्चवर्णीय, श्रीमंत वर्गाला भावणाऱ्या या कला प्रकारात मागासवर्गीयांना व्यासपीठ नव्हते. पण अशोक तांगडे आणि मनीषा तोकले या समाजसेवक दाम्पत्यांची मुलगी असलेली अंकुर कॉमिडीमधून नव्या प्रकारातील जातीवाद, मागासवर्गीयांचे समाजातील स्थान, त्यांचे अनुभव यावर परखड भाष्य करते. अन्य दोन सहकाऱ्यांना घेऊन 'ब्लू मटेरियल्स' या ग्रुपच्या माध्यमातून अंकुरने देश-विदेशात कॉमेडी शो केले आहेत. आता देशभर दौराकरून आंबेडकरी विचारांचे कलावंत जोडत त्यांना हक्काचे स्टेज देण्याची त्यांची योजना आहे.
कॉमिक्समधून बालपणीच आंबेडकरी विचारांची गोडी : सूरज वाघमारेफुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची पुस्तके लहान मुलांना समजण्यास जरा अवघड जातात. त्यामुळे लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत, भरपूर छायाचित्र असलेल्या कॉमिक्सची संकल्पना सोलापूरच्या सूरज वाघमारे यांना सुचली. त्यातूनच 'बा-भीमा' या पहिल्या आंबेडकरी कॉमिक्सचा जन्म झाला. सुरुवातीच्या अंकासाठी राहुल पगारे आणि आता सिद्धांत बोकेफोडे यांनी लेखन केलेल्या कॉमिक्सची लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना गोडी लागली आहे. याच धर्तीवर मासिकाची देखील निर्मिती करणार असल्याचे सूरज यांनी सांगितले.
'जय भीम कडक' रॅपची युवावर्गाला भुरळ : विपिन तातडशाळेत असताना रॅप ऐकण्यात आले पण त्यात कुठेच मी राहत असलेल्या झोपडपट्टीचा विषय नव्हता. यमक जुळवत कविता करायचो पण रॅपची जादू वेगळी होती, नव्या पिढीला रॅप कळते, म्हणून रॅपमधूनच बाबासाहेबांचे विचार आणि मागासवर्गीयांचे प्रश्न नव्या पिढीस सांगण्यास सुरुवात केल्याचे अमरावतीचा रॅपर विपिन तातडने सांगितले. पहिला आंबेडकरी रॅपर विपिनचे ‘जयभीम कडक’ हे रॅप देशभरात हिट झाले असून त्याच्या ‘रॅपटोळी ग्रुप’चे देशभरात शो होतात. रॅप या माध्यमातूनच यापुढेही बाबासाहेबांचे विचार मांडणार असून गरीब कलावंतांसाठी हक्काचा स्टुडिओ उभारण्याचा संकल्प विपिन याने केला आहे.