ऑनलाईन लोकमत / मयूर देवकर
औरंगाबाद, दि. १ : मराठी साहित्याला मोठी परंपरा आहे. अनेक नामवंत लेखक-कवींनी मराठी साहित्यात अभिजात कलाकृतींची भर घातली आहे. मात्र, ही साहित्य परंपरा पुढे केवळ काव्य क्षेत्रातच जपली जाणार की काय, अशी शंका निर्माण होत आहे. यावर्षी नवलेखक अनुदान योजनेसाठी पाठविण्यात आलेल्या हस्तलिखितांमध्ये काव्यसंग्रहांची संख्या मोठी आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे नवलेखक अनुदानासाठी प्राप्त ७३ हस्तलिखितांपैकी ५४ काव्यसंग्रह आहेत.
कवितांकडे असणारा कल आनंदाची गोष्ट असली तरी इतर वाङ्मय प्रकारांकडे होणारे दुर्लक्षही तेवढेच चिंतनीय आहे. यंदा केवळ २ कांदबºयांची हस्तलिखिते मंडळाला प्राप्त झाली. या व्यतिरिक्त २ नाटक, ८ कथासंग्रह, एकांकिका हस्तलिखिते योजनेसाठी पाठविण्यात आली. यावरून कविता वगळता इतर साहित्य प्रकारांमध्ये नवलेखकांना जास्त रस नसल्याचे दिसतेय.
‘लेखकांच्या पहिल्या वहिल्या प्रयत्नांना बळ मिळावे, या उद्देशाने ही योजना मंडळाने सुरू केली. मात्र, नवलेखकांचा अत्यल्प प्रतिसाद आणि त्यातही वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मितीचा अभाव या गोष्टी चिंताजनक असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. २०१६ साली ४८ हस्तलिखिते आली होती. यावर्षी २५ ने वाढ होऊन ७३ हस्तलिखिते आली. एवढ्या मोठ्या राज्यातून शंभरही हस्तलिखिते मिळू नये, याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
बालवाङ्मयाची वाताहत
साहित्य प्रकारांमध्ये बालवाङ्मयाची परिस्थिती फार वाईट आहे. यावर्षी केवळ ३ बालवाङ्मय हस्तलिखिते दाखल झाली. या प्रकारात बालकथा, कादंबरी, कविता, नाटक, एकांकिका सादर केली जाऊ शकतात. या तीन हस्तलिखितांपैकी केवळ एक अनुदानासाठी पात्र ठरले. बालसाहित्याचा ठपका बसला की, लेखकाच्या इतर लिखाणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. म्हणून बालसाहित्य आम्ही लिहीत नाही, असे एका ज्येष्ठ साहित्यिकाने सांगितले.
१८ लेखकांना अनुदान
नवलेखक अनुदान योजनेंतर्गत यंदा १८ लेखक अनुदानास पात्र ठरले. त्यामध्ये ८ कवी, ४ कथालेखक, १ कादंबरीकार, ४ ललित, गद्य लेखक व एका बालसाहित्यिकाचा समावेश आहे. नाटक, एकांकिका प्रकारात सादर झालेली दोन्ही हस्तलिखिते अनुदानास पात्र ठरली नाहीत. चरित्र, प्रवासवर्णन, वैचारिक, संशोधनपर साहित्य कुणीही पाठविले नाही. अनुदान प्राप्त लेखकांमध्ये मराठवाड्याच्या डॉ. ज्योती धर्माधिकारी-कुलकर्णी (ललित लेखसंग्रह), अशोक गायकवाड (काव्यसंग्रह) आणि रवींद्र भयवाळ (कथासंग्रह) यांचा समावेश आहे. पात्र नवलेखकांचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मंडळातर्फे प्रकाशकाला ५०० प्रती छापण्यासाठी लागणाºया खर्चाच्या ७५ टक्के अनुदान दिले जाते.