पुणे : गुन्हे शाखेमध्ये नवनियुक्त पोलीस निरीक्षकांना सध्या ‘बाहेरचा रस्ता’ दाखवण्याच्या तयारीत गुन्हे शाखेचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत. आयुक्तालयामध्ये आपले वजन राखून असलेले, तसेच ‘एस्टॅब्लिश’ झालेले काही अधिकारी आयुक्तालय सोडायला तयार नसल्यामुळे नवीन अधिकाऱ्यांना सध्या बसायला जागाच शिल्लक नाही. आयुक्तालयामध्ये सुरु असलेल्या प्रस्थापितांच्या मनमानीकडे पोलीस आयुक्तांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.नुकत्याच गुन्हे शाखेच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. आपल्याला मनासारखी नियुक्ती मिळावी म्हणून काही अधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांचे फोन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना येतील, अशी व्यवस्था केली. तर काही जणांनी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने पोस्टिंग आपल्या पदरात पाडून घेतल्या. दरोडा प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षकाची तर अवघ्या नऊ महिन्यांतच उचलबांगडी करण्यात आली. मात्र, त्याच ठिकाणी आयुक्तालयातच गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या अधिकाऱ्याला बसविण्यात आल्याने तो चर्चेचा विषय झाला. या निरीक्षकाने आपल्या आधीच्या युनिटमधील सहायक निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांना एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने दरोडा पथकात घेतले. मग पथकाची जागा तरी कशाला बदलायची, केवळ पथकांच्या पाट्यांची आदला बदल केली असती तरी चालली असती, असा खोचक सवाल काही अधिकारी करीत आहेत. काही पथकांना पोलीस निरीक्षक दिलेले असले, तरी अद्याप या निरीक्षकांकडे ना कर्मचारी, ना जागा अशी अवस्था आहे. नवीन निरीक्षकांकडे ‘सेट’ झालेले कर्मचारी जायला तयार नाहीत. आपले बसलेले ‘रुटीन’ तोडायला तयार नसलेले कर्मचारी आयुक्तालय सोडायलाही तयार नाहीत. सर्व काही ‘महिना अखेरी’साठी अशी स्थिती गुन्हे शाखेत पाहायला मिळत आहे. हप्तेखोरी आणि गुन्हेगारांना अभय या द्विसूत्रीवर सध्या गुन्हे शाखेचे काम चालत असल्याची टीकाही आयुक्तालयातूनच होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, आशा लगड, अलुरकर, ढमढेरे आदी महत्त्वपूर्ण खुनाना गुन्हे शाखा वाचा फोडू शकलेली नाही. तसेच बिबवेवाडीतील केटरींग व्यापाऱ्याच्या खुनाचा गुन्हा स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला. महत्त्वपूर्ण आणि कस लागेल अशा गुन्ह्यांची पाळेमुळे शोधून काढण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांचेच वर्चस्व सध्या आयुक्तालयावर असल्याचे चित्र आहे. अपयशी व्हा आणि ‘क्रीम पोस्ट’ मिळवा, अशी योजना आयुक्तालयामध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
नव्या पोलीस निरीक्षकांनाच हवाय न्याय?
By admin | Published: June 18, 2014 12:43 AM