औरंगाबाद : एसईबीसीच्या निर्णयामुळे पुढे ढकललेल्या नियमित प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. अकरावी प्रवेशासाठीच्या रिक्त जागा २६ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येतील. त्यानंतर दि.२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत अर्ज क्रमांक १ आणि अर्ज क्रमांक २ भरण्यासाठी मुदत आहे. ५ डिसेंबरला प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. यात अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना ५ ते ९ डिसेंबरदरम्यान प्रवेश घेण्यास मुदत दिली जाणार आहे, तर तिसऱ्या फेरीसाठी १० डिसेंबरला रिक्त जागा जाहीर होतील.
जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी एकूण ११६ महाविद्यालयांत ३१ हजार ४६५ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी अर्जाचा पहिला भाग १९ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी भरला होता, तर १९ हजार ३५९ विद्यार्थ्यांची पडताळणी झाली आहे. अर्जाचा भाग दोन हा १६ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी भरला. पहिल्या फेरीसाठी ८ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला, तर कोटा प्रवेशात १ हजार ७८२ जणांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या फेरीसाठी २,८६० विद्यार्थी पात्र ठरले होते.
एसईबीसीच्या निर्णयामुळे पुढील प्रक्रिया सध्या स्थगित केली होती. २४ नोव्हेंबरच्या शासनादेशानुसार, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजीच्या याचिकेमध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून संबंधित प्रशासकीय विभागांनी वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबरनंतर सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील; परंतु त्यांना प्रवेश देण्यात आला नसेल अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.