छत्रपती संभाजीनगर : ठरावीक महिन्यांसाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका सुशिक्षित तरुणाने जवळपास १९०० ठेवीदारांना १०० कोटींचा गंडा घातला आहे. मनोजराजे विष्णू भोसले (३५, रा. माउलीनगर, बीड बायपास) असे त्याचे नाव आहे. संतप्त ठेवीदारांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ठेवीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये मनोजने एस.एम. ग्रोथ नावाने कंपनी स्थापन केली होती. शेअर मार्केट ट्रेडिंगची कंपनी असल्याचा दावा करून त्याने अनेकांना यात गुंतवणुकीस भाग पाडले. १०, १५, २० महिन्यांसाठी गुंतवणूक करून त्याने १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवले. उल्कानगरीमधील खिंवसरा पार्कमध्ये त्याने कार्यालयदेखील थाटले होते. डिसेंबर, २०२३ पर्यंत काही ठेवीदारांना परतावादेखील दिला. त्यानंतर मात्र ऑडिटचे कारण सांगून पैसे देणे बंद केले. वारंवार झुम कॉलवर तो आश्वासन देत गेला. मात्र, मार्च महिन्यानंतर तो पसार झाला. शहरासह वसमत येथील जवळपास २ हजार ठेवीदारांना त्याने हे आमिष दाखवून जवळपास १०० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा दावा ठेवीदारांनी केला आहे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेमनोजचे आई-वडील शिक्षक आहेत. कन्नडमधील प्राध्यापक कॉलनीत त्याचे कुटुंब राहते. ठेवीदारांनी त्याच्या खिंवसरामधील कार्यालयासह घरदेखील गाठले. मात्र, तो मिळून आला नाही. मनोजने गारखेड्यातील सुनील उगलमुगले यांच्यासोबत भागीदारीत कंपनी सुरू केली होती. मात्र, मनोजने फसवल्याने तणावातून सुनील यांनी २० फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. सुनील यांची पत्नी सुकन्या यांच्या तक्रारीवरून मनोजसह सोनम भल्ला, नरेश भल्ला यांच्यावर मार्च महिन्यामध्ये पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.
कार्यालय रिकामे केलेठेवीदारांनी पैशांसाठी तगादा सुरू केला होता. त्यातच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मनोज पसार झाला. मनोजने काही महिन्यांपूर्वी आलिशान गाड्यादेखील खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्याने खिंवसरामधील कार्यालयदेखील बंद केले. सध्या तेथे गाळा भाड्याने देण्याचा बोर्ड आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ठेवीदारांना मंगळवारी सर्व माहिती घेऊन हजर राहण्यास सांगितले आहे.