औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली नसल्याचा निर्वाळा आज नगरविकास विभागाने लेखी पत्राद्वारे दिला. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा मार्ग आणखी मोकळा झाला. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २६७ कोटी, संत एकनाथ रंगमंदिरासाठी ८ कोटी, बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ५९ कोटी रुपये देण्याचे आश्वासन नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा पदाधिकारी, शिवसेना नेत्यांना दिले. या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे शहर विकासाला गती मिळणार आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी पहिला चौकारच मारण्यात आला आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी १,६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून ही योजना मंजूर केली होती. विद्यमान सरकारने या योजनेला स्थगिती दिल्याच्या मुद्यावरून भाजपने सेनेची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली होती. आज नगरविकास विभागाने योजनेला स्थगिती दिली नसल्याचा निर्वाळा देत योजनेची निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच राज्यातील काही विकासकामांना ब्रेक लावला. त्यामध्ये औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेचाही समावेश असल्याची ओरड भाजपकडून सुरू झाली. याच मुद्यावर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी जोरदार निदर्शनेही केली. सेनेवर दबाव वाढविण्यासाठी सर्व भाजप नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षाकडे सादर केले. महापालिकेत सेनेसोबत असलेली युती तुटल्याचेही भाजपने जाहीर करून टाकले. स्थायी समिती सभापती, वॉर्ड सभापती आदी पदांवर भाजपचे पदाधिकारी कायम आहेत.
नवीन पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर भाजपने महापालिकेत सेनेची चांगलीच कोंडी केली. त्यानंतर तातडीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा सभागृह नेते विकास जैन आज नागपुरात दाखल झाले. त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी पुन्हा नमूद केले की, नवीन पाणीपुरवठा योजनेला शासनाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. नगरविकास विभागाने यासंदर्भात पत्र द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर नगरविकास विभागाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी आ. अंबादास दानवे यांना पत्र पाठविले. या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्टÑ सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सुरू ठेवावी. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, मनपा आयुक्तांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे.
पत्र पाहिजे हे घ्या...नवीन पाणीपुरवठा योजनेला स्थगिती नाही, असे सेना नेत्यांनी वारंवार सांगितले. त्यानंतरही भाजपचे नगरसेवक स्थगिती नाही, असे पत्र दाखवा, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करीत होते. आता नगरविकास विभागाने योजनेला स्थगिती नसल्याचा निर्वाळा दिल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे.
निविदेची मुदत १५ दिवस कमी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया संपताच वर्कआॅर्डर देण्यासाठी विलंब लागेल. त्यात मनपा निवडणुकीची आचारसंहिताही लागू शकते. त्यामुळे निविदा भरण्याची मुदत ३० डिसेंबर करावी, अशी मागणी सेना नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली.
शहरातील रस्ते गुळगुळीत होणारशहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने २६७ कोटी रुपयांची मागणी यापूर्वीच शासनाकडे केली आहे. रस्त्यांसाठी निधी देण्याची हमी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढील आठवड्यात यासंदर्भात मुंबईत एक बैठक आयोजित करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. महाराष्टÑ शासनाने यापूर्वी दिलेल्या १०० कोटींतील रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही शिष्टमंडळाने दिली.
संत एकनाथ रंगमंदिराचे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता उस्मानपुऱ्यातील संत एकनाथ रंगमंदिराचे काम महापालिकेने सुरू केले आहे. या कामासाठी निधी कमी पडत असल्याने काम थांबले होते. महापालिकेने राज्य शासनाकडे ८ कोटींची मागणी केली होती. मंत्री एकनाथ शिंदे यांनी संत एकनाथ रंगमंदिराला ८ कोटी रुपये देण्यास तत्त्वत: मान्यता दिली.
बाळासाहेब ठाकरे स्मारकही मार्गी लागणारएमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपाला ५ कोटी रुपये दिले आहेत. मनपाने विकास आराखडा तयार केला. प्रकल्पास ६४ कोटी रुपये लागत आहेत. मनपाने निविदा प्रक्रियाही राबवून ठेवली आहे. अलीकडे देवेंद्र फडणवीस सरकारने स्मारक १० कोटीतच पूर्ण करा म्हणून सेनेची कोंडी केली होती. आज सेना नेत्यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी उर्वरित ५९ कोटी रुपये देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.